संतोष भिसे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली - मिरजेतून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या हळूहळू वाढविण्यात येत आहे. या सर्व गाड्या एक्सप्रेस किंवा विशेष दर्जाच्या आहेत. पॅसेंजर गाड्या मात्र अद्याप यार्डातच आहेत. कोरोना फक्त पॅसेंजर रेल्वेतूनच पसरतो का? असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.
सांगली, सातारा, कोल्हापूर, बेळगावच्या प्रवाशांसाठी पॅसेंजर गाड्या अत्यंत जिव्हाळ्याच्या आहेत. विशेषत: सांगली, मिरजेतून बेळगाव आणि कोल्हापूर मार्गावर दररोज वीस हजारांहून अधिक प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. पॅसेंजर गाड्या कधी सुरु होतात, याकडे त्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. या शहरांतील व्यवहार अद्याप पूर्ण क्षमतेने सुरु झाले नसले तरी चाचण्या केलेल्या प्रवाशांची ये-जा सुरुच आहे. त्यांच्यासाठी पॅसेंजर गरजेच्या आहेत.
बॉक्स
सध्या सुरु असणाऱ्या एक्सप्रेस
- कोल्हापूर - हरिप्रिया तिरुपती
- कोल्हापूर - मुंबई महालक्ष्मी
- मिरज - बेंगलुरु राणी चेन्नम्मा
- यशवंतपूर - अजमेर एक्सप्रेस
- यशवंतपूर - जोधपूर एक्सप्रेस
- म्हैसूर - अजमेर एक्सप्रेस
- कोल्हापूर - गोंदिया महाराष्ट्र
- गोवा - निजामुद्दीन एक्सप्रेस
- कोल्हापूर - अहमदाबाद
- थिरुनरवेल्ली - दादर चालुक्य
- हुबळी - दादर एक्सप्रेस
- कोल्हापूर - मुंबई कोयना
- यशवंतपूर - निजामुद्दीन
बॉक्स
मग पॅसेंजरच बंद का?
देशभरातून धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्या सांगली, मिरजेतून जातात. दररोज काही हजार प्रवाशांची येथे चढ-उतार होते. कोरोना चाचणी प्रमाणपत्रांसह त्यांना प्रवासासाठी परवानगी आहे, या स्थितीत पॅसेंजर गाड्यांनीच काय घोडे मारलेय? असा प्रश्न प्रवासी उपस्थित करत आहेत.
कोट
एक्सप्रेसचा प्रवास परवडणारा नाही
कोल्हापूर किंवा बेळगावला जाण्यासाठी एक्सप्रेसचा प्रवास परवडत नाही. कामानिमित्त दररोज या शहरांचा प्रवास करावा लागतो. कोरोनापूर्वी पासदेखील काढला होता. गेल्या दीड वर्षांपासून पॅसेंजर बंद असल्याने प्रवास थांबला आहे. अत्यावश्यक कामावेळी एक्सप्रेसने जातो.
- शोएब मुल्ला, प्रवासी, मिरज
काही महत्त्वाच्या मार्गांवरील पॅसेंजर सुरु केल्या पाहिजेत. सकाळी व संध्याकाळी काही मोजक्याच गाड्या सुरु झाल्या तरी प्रवाशांना दिलासा मिळेल. विशेषत: कोल्हापूर, बेळगाव आणि पुणे मार्गांवर पॅसेंजर सोडल्या पाहिजेत. कोरोना चाचणी प्रमाणपत्र सक्तीचे केल्यास संसर्गाची भीती राहणार नाही.
- अनिकेत जैन, प्रवासी, सांगली.
सध्यातरी नियोजन नाही
सध्या काही लांबपल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या धावत आहेत. आणखी काही सुरु होणार असल्यास प्रवाशांना कल्पना दिली जाईल. पॅसेंजर गाड्या सुरु करण्याचे कोणतेही नियोजन सध्यातरी नाही.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग