स्वच्छता अभियानातील कामाच्या निविदा काढा, अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:24 AM2020-12-08T04:24:27+5:302020-12-08T04:24:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिका क्षेत्रात सुरु असलेली कामे विनानिविदा सुरु आहेत. त्यामुळे महापालिकेचे नुकसान ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिका क्षेत्रात सुरु असलेली कामे विनानिविदा सुरु आहेत. त्यामुळे महापालिकेचे नुकसान होत आहे. ठराविक मक्तेदारांना पोसण्याचे धंदे बंद करून स्वच्छतेची कामे निविदा पध्दतीने करावीत,, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांनी दिला आहे.
स्वच्छ भारत अभियानाचा बाऊ करत महापालिका प्रशासनाकडून मनपा क्षेत्रात अनेक कामे विनानिविदा सुरु आहेत. प्रशासनाच्या या अनागोंदी कारभाराविरोधात नाराजीचा सूर उमटू लागला आहे. दरम्यान, स्वच्छतेची सर्व कामे निविदा पध्दतीनेच करावीत, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सूर्यवंशी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे. यामध्ये पारदर्शक कारभाराला तडा देत प्रशासनाकडून स्वच्छतेची कामे विनानिविदा सुरु आहेत. यामुळे स्पर्धा होत नाही. परिणामी महापालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारही बोकाळू शकतो. असे झाल्यास शासनदरबारी महापालिकेची प्रतिमा मलीन होऊ शकते. शहराच्या नावलौकिकास बाधा निर्माण होऊ शकते. भविष्यातील विकास निधीवरही याचा परिणाम होऊ शकतो. पण याकडे दुर्लक्ष करुन प्रशासनाकडून ठारविक मक्तेदारांना पोसण्याचा धंदा सुरु आहे. तो तत्काळ बंद करावा. सर्व कामांच्या रितसर निविदा काढाव्यात. त्यामुळे नवीन मक्तेदारांना काम मिळेल. स्पर्धा होईल. महापालिकेचाही फायदा होईल. दरम्यान, या मागणीकडे दुर्लक्ष करुन विनानिविदा काम केल्यास भाजप युवा मोर्चाच्यावतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी किरण भोसले, प्रथमेश वैद्य, सोहम जोशी आदी उपस्थित होते.