सांगली : मिरज डेपोची नाशिक-मिरज ही बस खेड-शिवापूर येथे आल्यानंतर पुढील वाहनांनी अचानक ब्रेक लावल्यामुळे शनिवारी एक विचित्र व मोठा अपघात होणार होता. चालकाने प्रसंगावधान राखून बस एका हॉटेलच्या कठड्यावर नेऊन आदळल्याने सांगली, मिरजेतील ४२ प्रवाशांचे प्राण वाचले.शनिवारी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मिरज डेपोची नाशिकहून मिरजेला निघालेली बस (क्र. एमएच 0९, १७१५) ही खेड-शिवापूरजवळ आल्यानंतर महामार्गावर एक घटना घडली. समोरील दोन वाहनांच्या आडवी एक कार आल्यामुळे पुढील सर्व वाहनांनी जोराचा ब्रेक लावला. त्यामुळे वाहने जागच्या जागी थांबली. मिरज डेपोच्या बसपुढेच सातारा आगाराची एक बस होती. ती बसही लडबडली. त्यामुळे मोठा अपघात होणार हे चालकाला जाणवले. अचानक ब्रेक दाबल्यानंतरही ही बस समोरच्या बसवर आदळणारच होती. त्यामुळे चालक एस. के. शिंदे यांनी स्टेअरिंग जोरात फिरवून बस एका हॉटेलच्या दिशेने नेली कठड्यावर नेऊन थांबविली.अचानक ब्रेक लावून एसटी बस रस्त्याकडेला एका हॉटेलच्या कठड्यावर गेल्याने प्रवाशांचाही तोल गेला, मात्र कोणतीही दुर्घटना घडली नाही. ज्यावेळी हा प्रकार त्यांच्या लक्षात आला तेव्हा साºया प्रवाशांनी खाली उतरून सुटकेचा श्वास सोडला. कुणी देवाला, तर कुणी चालकाला धन्यवाद देऊ लागले. चालकाच्या प्रसंगावधानाबद्दल प्रवाशांनी कौतुक केले. त्यानंतर रात्री उशिरा ही बस मिरजेच्या दिशेने रवाना झाली.
चालकामुळे वाचले सांगली, मिरजेतील प्रवाशांचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:10 AM