लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील आरआयटी आणि चातक इनोव्हेशनस या कंपनीमध्ये ड्रोन संशोधन आणि निर्मितीचा सामंजस्य करार झाल्याची माहिती संचालिका डॉ. सुषमा कुलकर्णी यांनी दिली. या करारामुळे वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती औषध फवारणीसाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्याची संधी मिळणार आहे.
डॉ. कुलकर्णी म्हणाल्या, शेतीकामासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांना करता यावा हे स्वप्न राजारामबापू पाटील यांनी पाहिले होते. तेच स्वप्न उराशी बाळगून जलसंपदामंत्री जयंत पाटील हे तालुक्यातील शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान उपलब्ध आणि अवगत व्हावे यासाठी प्रयत्नशील आहेत. हाच वारसा पुढे चालवत युवानेते प्रतीक पाटील यांनी शेतीसाठी नवीन तंत्रज्ञानाची कास धरली आहे. गेले वर्षभर शेतकरी परिसंवादाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांचे प्रबोधन केले आहे. तसेच शेतीमध्ये औषध फवारणीसाठी अत्याधुनिक अशा ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर कारण्यासंदर्भात ते आग्रही होते. त्यासाठी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांनी ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे औषध फवारणीची प्रात्यक्षिके घेतली. एवढेच नाही तर हे ड्रोन तंत्रज्ञान अल्प खर्चात शेतकऱ्यांना कसे उपलब्ध होईल, त्यासाठी गेले वर्षभर ते प्रयत्नशील होते.
त्या म्हणाल्या, त्याचेच फलित म्हणून या ड्रोन तंत्रज्ञानाच्या निर्मितीमध्ये आपल्या भागातील संशोधकांचा आणि विद्यार्थ्यांचा सहभाग असावा आणि ड्रोन निर्मितीचा सामंजस्य करार प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरआयटी महाविद्यालय आणि चातक इनोव्हेशन्स कंपनीमध्ये झाला. या करारानुसार दोन्ही संस्था मिळून शेतीकामासाठी आवश्यक ड्रोनच्या निर्मितीसाठी लागणारे संशोधन, प्रशिक्षण, कौशल्यपूर्ण कर्मचारी, खर्च कपात आणि प्रत्यक्ष निर्मितीसाठी काम करणार आहेत. तसेच चातक इनोव्हेशन्स कंपनी यासाठी लागणारे अर्थसाहाय्य सुद्धा करणार असल्यामुळे लवकरच स्वयंपूर्ण ड्रोनचे उत्पादन शक्य होणार आहे. सध्या या ड्रोनच्या निर्मितीसाठी लागणारे साहित्य बाहेरून आयात करून प्रत्यक्ष निर्मिती सुरू झाली आहे.
या सामंजस्य कराराप्रसंगी युवानेते प्रतीक पाटील, आरआयटीच्या संचालिका डॉ. सुषमा कुलकर्णी, राजारामबापू ग्रुप ऑफ कंपनीजचे उपाध्यक्ष सुभाष जमदाडे, आरआयटीच्या संशोधन आणि विकास विभागाचे अधिष्ठाता डॉ. ए. बी. काकडे, चातक इनोव्हेशन्सचे संचालक अजित खर्जुल आणि प्रा. सचिन कुंभार उपस्थित होते.
फोटो : ०५ इस्लामपूर २
ओळ : इस्लामपूर येथे ड्रोन निर्मितीच्या सामंजस्य कारारावेळी प्रतीक पाटील, डॉ. सुषमा कुलकर्णी, सुभाष जमदाडे, डॉ. ए. बी. काकडे, अजित खर्जुल, प्रा. सचिन कुंभार उपस्थित होते.