रुग्णसंख्येत वाळवा, सांगलीचा ४६ टक्के वाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:19 AM2021-06-25T04:19:14+5:302021-06-25T04:19:14+5:30
सांगली : जिल्ह्यातील रुग्णसंख्येचा आलेख खाली येण्यास वाळवा तालुका व महापालिका क्षेत्राचा मोठा अडसर येत आहे. अन्य तालुक्यांत रुग्णसंख्या ...
सांगली : जिल्ह्यातील रुग्णसंख्येचा आलेख खाली येण्यास वाळवा तालुका व महापालिका क्षेत्राचा मोठा अडसर येत आहे. अन्य तालुक्यांत रुग्णसंख्या घटत असताना या दोन्ही ठिकाणची रुग्णसंख्या कमी होत नाही. एकूण रुग्णसंख्येत या दोन्ही ठिकाणचा एकूण वाटा ४६ टक्क्यांच्या घरात गेला आहे.
सांगली जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत. वाळवा तालुका वगळता अन्य तालुक्यांमध्ये दररोजची रुग्णसंख्या शंभरच्या खाली गेली असताना महापालिका क्षेत्रासह वाळवा तालुक्याची रुग्णसंख्या सतत १०० ते २५०च्या घरात आहे. २२ जून रोजीच्या एकूण रुग्णसंख्येत या दोन्ही ठिकाणचा वाटा ५० टक्के इतका नोंदला गेला. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी रुग्णसंख्या घटल्याशिवाय जिल्ह्याचा एकूण रुग्णसंख्येचा आलेख खाली जाणार नाही. त्यामुळे या भागात अधिक उपाययोजना करण्याची गरज आहे.
महापालिका क्षेत्र व इस्लामपूर शहरात नियम मोडणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. बेशिस्त गर्दीचे दर्शन याठिकाणी वारंवार घडत आहे. त्यामुळे येथील रुग्णसंख्या आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत नाहीत. महापालिका क्षेत्रात चाचण्याही अधिक होत असल्याने रुग्णसंख्या अधिक दिसत असल्याचेही मत मांडले जात आहे. तरीही येथील रुग्णसंख्या स्थिर असल्याचे चित्र आहे.
चौकट
वाळवा, महापालिका क्षेत्राचा एकूण रुग्णसंख्येतील वाटा
तारीख टक्के
१४ जून ३५
१५ जून ३८
१६ जून ४३
१७ ३५
१८ ३५
१९ ३८
२० ४०
२१ ३९
२२ ५०
२३ ४६
चौकट
आजवरच्या पॉझिटिव्ह रुग्णसंख्येतील वाटा
वाळवा १३ टक्के
महापालिका २२ टक्के
एकूण ३५ टक्के
चौकट
मृत्यूदरही चिंताजनक
महापालिका क्षेत्रातील मृत्यूदर सध्या ३.२१ टक्के तर इस्लामपूरचा मृत्यूदर ३.३३ टक्के इतका आहे. जिल्ह्याचा एकूण मृत्यूदर पाहिला तर तो २.८४ टक्के आहे. जिल्ह्याच्या मृत्यूदरापेक्षा या दोन ठिकाणचा मृत्यूदर अधिक आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी उपाययोजना करण्याची गरज आहे.
चौकट
आकडेवारी चढ-उतार कायम
जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या १ हजाराच्या आत आली असली तरी आकडेवारीतील चढ-उतार कायम आहे. कधी ६००च्या घरात असणारी रुग्णसंख्या अचानक ९०० पार होत आहे.