वाळवा-शिराळ्यात सोयीच्या आघाड्यांवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:24 AM2017-09-19T00:24:33+5:302017-09-19T00:24:33+5:30

Dry-winters fit on convenient fronts | वाळवा-शिराळ्यात सोयीच्या आघाड्यांवर भर

वाळवा-शिराळ्यात सोयीच्या आघाड्यांवर भर

Next



अशोक पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : ग्रामपंचायत निवडणूक पक्ष पातळीवर न होता गटांतर्गत होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. वाळवा-शिराळ्यात आमदार जयंत पाटील, माजी आ. मानसिंगराव नाईक, हुतात्मा सुंकुलाचे वैभव नायकवडी, भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, काँग्रेसचे सत्यजित देशमुख, नानासाहेब महाडिक यांचे गट सक्षम आहेत. या गटांच्या प्रत्येक गावांमध्ये सोयीच्या आघाड्या होणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.
राष्ट्रीय आणि राज्य पक्षाबरोबरच शिवसेना, आर. पी. आय., स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी संघटना आदी पक्षाचे नेतेही निवडणूकीत पक्षांना सोयीचा पाठिंबा देणार असल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या आदेशाला बगल देत स्वत:च्या राजकीय अस्तित्वासाठी हा निर्णय घेतला आहे.
शिराळा येथे माजी आ. मानसिंगराव नाईक व काँग्रेसचे सत्यजित देशमुख या दोन भाऊंची ‘समझोता एक्स्प्रेस’ काही अपवादात्मक निवडणुका सोडल्या, तर नेहमीच सुसाट धावल्याचे चित्र आहे. मानसिंगराव नाईक यांच्याकडे संस्था आणि कारखान्याच्या माध्यमातून कामगार शक्ती मोठी आहे. तरीसुध्दा त्यांना काँग्रेसची साथ घ्यावी लागते. या दोघांच्या विरोधात भाजपचे शिवाजीराव नाईक यांच्या गटानेही सत्तेच्या जोरावर मोठे आव्हान देण्याचा प्रयत्न चालू आहे.
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी यांच्या गटाची ताकद पाहता, वैभव नायकवडी, नानासाहेब महाडिक यांनी तर ग्रामपंचायत निवडणुकीत आघाडी स्थापन करण्याला बगल देत दोन्ही गट आपआपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत. याउलट जयंत पाटील हे राजारामबापू उद्योग समूहातील कामगार शक्तीच्या ताकदीवर आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर ग्रामपंचायत निवडणुकीत उतरणार आहेत. परंतु प्रत्येक गावात त्यांच्या पक्षांतर्गत गटांची असणारी धुसफूस हा डोकेदुखीचा विषय असतो. यावेळी जयंत पाटील यांनाच बगल देऊन स्वत:च्या गटाची ताकद दाखविण्यासाठी ग्रामीण भागातील बहुतांशी नेते, कार्यकर्ते सरसावले आहेत. या निवडणुकीत जो निवडून येईल तो आमचाच, अशी भूमिका जयंत पाटील घेणार आहेत.
इस्लामपूर पालिकेचे पक्षप्रतोद विक्रमभाऊ पाटील यांनी वाळवा-शिराळा तालुक्यात भाजपला मानणाºया कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. परंतु ग्रामीण भागात अद्यापही विक्रम पाटील यांचा संपर्क म्हणावा तसा नाही. त्यामुळे त्यांचा निर्णय कितपत योग्य ठरणार, हे आगामी निवडणूकीत स्पष्ट होईल.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीत पाच जागा मिळाल्याने पवार यांची ताकद चांगलीच वाढली आहे. त्यामुळे त्यांनीही ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याबाबत चाचपणी सुरु केली आहे.
स्वाभिमानी, बळीराजा शेतकरी संघटना व शेतकरी संघटना या संघटनांच्या निर्णयाकडेही मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे. या नेत्यांची भूमिका काय असणार, असाही प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित होतांना दिसत आहे.

Web Title: Dry-winters fit on convenient fronts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.