सांगली : मुलगी झाल्याने व प्रकृती अशक्त बनत गेल्याने मिरजेतील पूजा आबासाहेब पवार (वय २५) या विवाहितेस कर्नाटकातील विजापूर येथील मांत्रिकाने दिलेले औषध जबरदस्तीने पाजून तिचा बळी घेतल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उजेडात आला. तब्बल आठ महिने पूजाची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर २३ आॅगस्टला तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी मांत्रिकासह पूजाच्या सासरकडील मंडळींविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सातारा येथील अॅड. वर्षा देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
देशपांडे म्हणाल्या, माहुली (जि. सातारा) हे पूजाचे माहेर आहे. ३० डिसेंबर २०१५ रोजी तिचा मिरजेतील मालगाव रस्त्यावरील खोतनगर येथील आबासाहेब पवार याच्याशी विवाह झाला. लग्नानंतर सर्व काही ठीक होते. पावणेदोन वर्षापूर्वी त्यांना मुलगी झाली. तेव्हापासून पती आबासाहेब पवार, सासू रुक्मिणी पवार, सासरा दादू पवार, नणंद आक्काताई वंजारी यांनी पूजाचा छळ सुरु केला. त्यामुळे पूजा माहुलीला माहेरी निघून गेली. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्यांतर्गत पूजाने सासरच्या मंडळींविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी सुरु होण्यापूर्वीच सासरच्यांनी नमते घेऊन पूजाला नांंदविण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे पूजा सासरी आली. पण पूजाची प्रकृती फारच खराब झाली होती. तिचे वजन २४ किलो झाले होते.
देशपांडे म्हणाल्या, पूजाची प्रकृती सुधारण्यासाठी सासरच्यांनी ५ मे २०१८ रोजी विजापूर येथील इब्राहीम विजापुरे या मांत्रिकास मिरजेत घरी बोलावून घेतले व पूजाच्या प्रकृतीविषयी सांगितले. त्यावर मांत्रिकाने दिलेले औषध सासरच्यांनी पूजाला सलग तीन दिवस जबरदस्तीने पाजले. हे औषध पाजण्यासाठी पूजाच्या सासूचा भाऊ शंकर चुनाडे (रा. भोर, जि. पुणे) हाही आला होता. औषध पिताना खूप त्रास होत असल्याने पूजाने अनेकदा नकार दिला. पण सासरऱ्यांनी तिचे काहीच ऐकले नाही.
औषध पिल्यामुळे पूजाची प्रकृती अधिकच खालावत गेली. १० मेपासून ती खासगी रुग्णालयात दाखल होती. तिच्यावर दोनवेळा शस्त्रक्रिया झाली. यासाठी माहेरच्यांनी दहा लाख रुपये उपचारासाठी खर्च केले. पण पूजाची मृत्यूशी झुंज व्यर्थ ठरली. २३ आॅगस्टला तिचा मृत्यू झाला. त्यामुळे पावणेदोन वर्षाची तिची मुलगी साईशा आईविना पोरकी झाली आहे.यावेळी शाहीन शेख, सुरेख शेख यांच्यासह मृत पूजाच्या माहेरचे लोक उपस्थित होते.
नव्याने गुन्हा दाखल करावादेशपांडे म्हणाल्या, पूजाचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी, ती जिवंत असताना माहेरच्यांनी मिरज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार मांत्रिकासह, पती, सासू, सासरा, नणंद यांना अटक केली होती. सध्या ते जामिनावर बाहेर आले आहेत. पूजाचा आता मृत्यू झाला आहे. मुलगी झाल्याने व तिची प्रकृती अशक्त बनल्याने सासरच्यांनी मांत्रिकाने दिलेले औषध तिला पाजले. या औषधातून विषबाधा झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा अहवाल आहे. मांत्रिक व सासरच्या लोकांनीच पूजाचा बळी घेतला आहे. त्यामुळे संशयितांविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत नव्याने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जिल्हाधिकारी, जिल्हा सरकारी वकील आणि महिला व बाल विकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.भरपाई द्यावीदेशपांडे म्हणाल्या, पूजाच्या उपचारासाठी दहा लाख रुपये खर्च झाला आहे. मनोधैर्य योजनेंतर्गत तिच्या माहेरच्यांना आर्थिक मदत द्यावी. पूजाच्या लग्नात केलेला चार लाखाचा खर्च सासरच्या मंडळींकडून वसूल करावा. पूजाच्या मुलीचे संगोपन तिचे माहेरचे लोक करीत आहेत. यासाठी त्यांना संशयित पती आबासाहेब पवार याने महिन्याला पाच हजार रुपये द्यावेत.