डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका दीड महिन्याच्या बालिकेला जीव गमवावा लागल्याची घटना
By Admin | Published: September 25, 2014 09:48 PM2014-09-25T21:48:47+5:302014-09-25T23:25:42+5:30
आरोग्य केंद्रात दहा पदे रिक्त
खरसुंडी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका दीड महिन्याच्या बालिकेला जीव गमवावा लागल्याची घटना मंगळवारी घडली. या प्रकाराची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गिरीगोसावी यांच्या पथकाने चौकशी सुरू केली असून, दोषींवर कारवाईचा इशारा दिला आहे. मिटकी (ता. आटपाडी) येथील सौ. सविता कुंडलिक कोळेकर यांच्या दीड महिन्याच्या बालिकेला खरसुंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवार दि. १९ रोजी कावीळ व डीपीटीची लस टोचण्यात आली होती. त्या ठिकाणातून रक्तस्त्राव होऊ लागल्याने कोळेकर कुटुंबाने बालिकेला शुक्रवारी रात्री पुन्हा आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. त्यावेळी डॉ. एम. एम. जाधव तेथे उपस्थित नव्हते. इतर कर्मचाऱ्यांनी उपचार करण्यास असमर्थता दाखविली. शनिवारी डॉ. जाधव यांची साप्ताहिक सुट्टी होती. त्यामुळे परिचारिकांनी या बालिकेवर प्राथमिक उपचार केले व दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. रविवारी कोळेकर कुटुंबियांनी पुन्हा या बालिकेस आरोग्य केंद्रात आणल्यानंतर डॉ. जाधव यांनी तिची तपासणी केली व तिची प्रकृती ठीक असल्याचे सांगून नातेवाईकांना परत पाठविले. मात्र मंगळवारी या बालिकेची प्रकृती अधिकच खालावल्याने तिला पुन्हा डॉ. जाधव यांनी पुढील उपचारासाठी आटपाडीतील एका खासगी बालरोग तज्ज्ञाकडे पाठविले. त्या डॉक्टरांनी या बालिकेची तपासणी करून, तिच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण अत्यंत कमी झाले असून तिला सांगलीच्या वसंतदादा शासकीय रुग्णालयात दाखल करावे, असा सल्ला दिला. त्यानुसार कोळेकर कुटुंबीय सांगलीला येण्यास निघाले. मात्र प्रवासातच मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास या बालिकेचा मृत्यू झाला. जिल्हा प्रजनन बालआरोग्य अधिकारी डॉ. गिरीगोसावी यांना समजताच त्यांच्यासह पाचजणांचे पथक बुधवारी खरसुंडीत दाखल झाले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. आर. पवार, खरसुंडी आरोग्य केंद्राचे यु. एस. कदम यांनी खरसुंडी आरोग्य केंद्रात नातेवाईकांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी नातेवाईकांनी दोषी डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. डॉ. गिरीगोसावी यांनी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या बालिकेच्या शरीरात रक्तप्रवाह गोठण्यासाठी आवश्यक असणाऱ्या घटकाचे प्रमाण अतिशय कमी होते. हा एक दुर्मीळ प्रकार आहे. शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होऊन या बालिकेचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)
आरोग्य केंद्रात दहा पदे रिक्त
खरसुंडी आरोग्य केंद्रात अपुरा कर्मचारी वर्ग आहे. येथे एक आरोग्य अधिकारी, तीन सहाय्यक पुरूष कर्मचारी, दोन परिचारिका, दोन पर्यवेक्षक, एक औषध निर्माण अधिकारी, एक वाहनचालक अशी एकूण दहा पदे रिक्त आहेत. यामुळे इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांकडून रुग्णांची हेळसांड होते. त्याचाच परिणाम म्हणून या बालिकेचा मृत्यू झाला, असे मत डॉ. व्ही. आर. पवार यांनी व्यक्त केले.