विकास शहा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : सांगली जिल्ह्याच्या पश्चिम बाजूला वृक्ष संपदेने संपन्न असलेल्या ग्रामीण आणि दुर्गम शिराळा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वानरांच्या उपद्रवामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. प्लॅनेट अर्थ फाउंडेशनने यासंदर्भात अभ्यास करून शेतकऱ्यांची ही भीती अनाठायी असल्याचे सांगत त्यांना वृक्षताेडीपासुन परावृत्त करण्याचे प्रयत्न चालविले आहेत.
शेतीच्या बांधावर असणारी मोठी झाडे तोडल्यानंतर वानरांचा त्रास कमी होईल, या विचाराने बऱ्याच शेतकऱ्यांनी बांधावर तसेच ओढ्याशेजारील मोठी झाडे तोडली आहेत. परिणामी वानरांचे शेतीवरील हल्ले कमी होण्याऐवजी वाढले आहेत. वानरांना उपलब्ध होणारे नैसर्गिक अन्न कमी झाल्यामुळे तसेच त्यांचे नैसर्गिक अधिवास संपल्यामुळे वानरे जास्त प्रमाणात शेतीकडे आकर्षित होत आहेत.
परिणामी गावात असलेली सर्व झाडे नष्ट होत आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्या झाडावरील नैसर्गिक जैवविविधतादेखील नष्ट होत आहे. या वृक्षतोडीमध्ये प्रामुख्याने कडुलिंब, जांभूळ, करंज, निलगिरी, आंबा, वड, पिंपळ, उंबर, काटेसावर, आदी वृक्षांच्या तोडीचे प्रमाण जास्त आहे. याबाबत अभ्यास करून शिराळा तालुक्यात प्लॅनेट अर्थ फाैंडेशनने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती चालविली आहे.
चौकट
पर्यावरणाचा समताेल राखण्यास मदत करा
जगभरात तापमान वाढीमुळे होणारी भीषण परिस्थिती सुधारण्यासाठी आपला खारीचा वाटा म्हणून शेतकऱ्यांनी आपले बांधावरील झाड वाचवावे. शेतकऱ्यांनी व लाकूड तोड करणाऱ्या कंत्राटदारांनी तालुक्यात होणारी वृक्षतोड थांबवावी. पर्यावरणाचा समतोल साधण्यास मदत करावी, असे आवाहन प्लॅनेट अर्थ फौंडेशनचे उपाध्यक्ष आणि पर्यावरण अभ्यासक प्रणव महाजन यांनी केले आहे.