सांगली : जिल्हा परिषदेच्यावतीने मागील बत्तीस वर्षांपासून सुरु असलेली वसंतदादा घरकुल योजना यंदा बंद करण्यात आली आहे. वसंतदादांच्या जन्मशताब्दी वर्षातच जिल्हा परिषदेने ही घरकुल योजना बंद करण्याचा प्रताप केला आहे. घरकुलांचा निधी अन्य योजनांकडे वर्ग करण्यात आला आहे.जिल्हा परिषदेच्या स्वीय निधीतून १९८५ मध्ये वसंत घरकुल योजना सुरु करण्यात आली. शासनाच्या घरकुल योजनेमध्ये ज्या कुटुंबाला लाभ मिळत नाही, अशा कुटुंबासाठी वसंत घरकुल योजना फलदायी ठरली. प्रारंभी घरकुलासाठी पंचवीस हजार रुपयांचे अनुदान होते.
२००० नंतर पन्नास हजार अनुदान दिले जात होते. वाढत्या महागाईमुळे घरकुलाचे अनुदान वाढविण्यात यावे, अशी मागणी होत होती. त्यामुळे मागील पाच वर्षांपासून वसंत घरकुलासाठी ७५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत होते.माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु आहे. जिल्हा परिषदेने दादांच्या जन्मशताब्दी वर्षातच त्यांच्या नावाची घरकुल योजना बंद करण्याचा निर्णय घेतला. चार वर्षापूर्वी जिल्हा परिषदेने स्वीय निधीतून अपंग घरकुल योजना सुरु केली होती. ती योजनाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.केंद्राच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना सुरु आहे. त्याचा लाभ ग्रामीण भागातील लाभार्थींना मिळतो. याशिवाय पन्नास लाखापेक्षा जादा स्वीय निधी खर्चाच्या मान्यतेसाठी आयुक्तांकडून मान्यता घ्यावी लागत असल्याची कारणे पुढे करण्यात आली आहेत.वसंत आणि अपंग घरकुलांसाठी असलेला निधी अन्य योजनांकडे वर्ग करण्यात आला आहे. दादांच्या जन्मशताब्दी वर्षातच वसंत घरकुल योजना बंद करण्याचा घेतलेला निर्णय धक्कादायक आहे. सत्ताधारी भाजपविरोधात विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादी कोणती भूमिका घेणार, हे पाहावे लागणार आहे.अपूर्ण योजनांना तरतूदजिल्ह्यातील अपूर्ण वसंत घरकुल योजनेसाठी निधीची तरतूद केली आहे. स्वीय निधीतील रक्कम लक्षात घेऊन नवीन घरकुलांचे प्रस्ताव मागविले नाहीत. या घरकुलांचा निधी अन्य योजनांकडे वर्ग केला आहे. २०१७-१८ वर्षासाठी योजना बंद आहे.
समितीने भविष्यात ती चालू ठेवण्याचा निर्णय घेतला, तर पुढील आर्थिक वर्षात सुरू करता येईल. सर्व अधिकार जिल्हा परिषद समाजकल्याण समिती सदस्यांना आहेत, अशी प्रतिक्रिया समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी दिली.