सांगली : एका दिवसाची औपचारिकता दाखवून स्वच्छतेचा गाजावाजा करणाऱ्यांच्या गर्दीत युवकांची एक संघटना आपल्या सातत्यपूर्ण मोहिमेतून चमकत आहे. तब्बल २00 दिवस सलग स्वच्छता मोहिम राबविण्याचा विक्रम त्यांनी सांगलीमध्ये नोंदविला आहे. यामध्ये अनके गलिच्छ वस्त्यांना त्यांनी सुंदरतेचे वरदानही दिले.स्वच्छ सांगली, सुंदर सांगली, कचरामुक्त सांगली या संकल्पनेचा निर्धार करून १ मे महाराष्ट्र दिनापासून निर्धार संघटनेच्यावतीने स्वच्छता मोहीम सुरू केली होती. या मोहिमेस दोनशे दिवस पूर्ण झाले आहेत.
यानिमित्त सांगलीच्या कॉलेज कॉर्नर परिसरात स्वच्छता करण्यात आली. यावेळी स्थानिक नागरिकांनी सहभागी होऊन श्रमदान केले. येथील दुभाजकाची स्वच्छता व रंगरंगोटीही करण्यात आली.नावाप्रमाणे या संघटनेने स्वच्छतेचा निर्धार करीत त्याची अंमलबजावणीही केली. केवळ एकच दिवस नव्हे तर सलग दोनशे दिवस हे तरुण शहर स्वच्छतेसाठी राबत आहेत. दैनंदिन स्वच्छतेची जबाबदारी असणाऱ्या महपाालिकेप्रमाणे हे तरुण राबत आहे.
दीडशे दिवस पूर्ण झाल्यानंतर महापालिका आयुक्तांनी या तरुणांच्या अभियानाला दाद देत स्वत: सहभाग घेतला होता. त्यांच्या या कार्याचे कौतुक प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.
केवळ महापालिकेला दोष देत बसण्यापेक्षा नागरिकांचे लाखो हात उत्स्फूर्तपणे स्वच्छतेत गुंतावेत यासाठी त्यांनी प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे सर्व नागरिकांनी दिवसातून १ तास वेळ काढून आपापला परिसर स्वच्छ ठेवावा. निर्धार संघटनेच्या या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही या तरुणांमार्फत करण्यात येत आहे.निर्धार संघटनेचे अध्यक्ष राकेश दड्डण्णावर म्हणाले की, संत गाडगेबाबा व महात्मा गांधीजी यांच्या विचारांपासून प्रेरित होऊन आपला परिसर, गाव स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी आम्ही ही स्वच्छता यात्रा सुरू केली. आम्ही स्वच्छतेचे कार्य अखंडितपणे सुरू ठेवले आहे.
दररोज ४-५ किंवा जे काही युवक असतील त्यांना सोबत घेऊन, प्रसंगी एकटे असतानाही हे स्वच्छतेचे कार्य सुरू आहे. सोशल मीडियाच्या योग्य उपयोगामुळे दररोज युवक या अभियानात सहभागी होत आहेत. नागरिकांचाही या मोहिमेस पाठींबा मिळत आहे.
वास्तविक एक अभियान म्हणून नव्हे तर दैनंदिन कर्तव्य म्हणून नागरिकांमध्ये स्वच्छतेची बाब रुजली पाहिजे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या मोहिमेत सातत्य ठेऊन आम्ही असे करता येऊ शकते हे दाखवून देत आहोत.सेल्फी पॉर्इंटचा प्लस पॉर्इंटसांगलीत विकसीत केलेला सेल्फी पॉर्इंट स्वच्छता अभियानाचा एक प्लस पॉर्इंट ठरत आहे. त्यामुळे तरुणाईला असे सुंदर रचनात्मक परिसर निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. आम्ही यापुढेही शहरात ठिकठिकाणी असे सेल्फी पॉर्इंट विकसीत करून त्या त्या भागातील तरुणांना त्यासाठी प्रोत्साहीत करणार असल्याचे दड्डण्णावर यांनी सांगितले.