खेड्यापाड्यातील शाळांत ई-क्लासचा डंका!
By Admin | Published: July 23, 2014 10:53 PM2014-07-23T22:53:50+5:302014-07-23T23:00:20+5:30
मिरज पूर्वमधील चित्र : शिक्षक-पालकांची धडपड
प्रवीण जगताप -लिंगनूर
हजारो रुपये मोजून उच्चभ्रूंच्या मुलांना नामवंत शाळांमधून मिळणारे महागडे शिक्षण आता खेड्यापाड्यातील शाळेत मिळू लागले आहे. गरिबांच्या शाळा म्हणून हिणवल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद शाळाही ‘हमभी कुछ कम नही’चा प्रत्यय देत आहेत. मिरज पूर्वभागातील सुमारे वीसपेक्षा अधिक शाळांत प्रोजेक्टरवर ई-लर्निंग सुविधा निर्माण झाली असून, हे विद्यार्थीही डिजिटल धडे गिरवू लागले आहेत. अध्ययन, अध्यापन प्रक्रियेतील दृकश्राव्य माध्यमाचे महत्त्व लक्षात घेता आपल्या शाळेत ई-क्लास सुविधा सुरू करण्यासाठी शिक्षक व पालकांची धडपड सुरू आहे.
मिरज तालुक्यात आयएसओ मानांकन मिळवून महाराष्ट्रात अग्रेसर ठरणाऱ्या विक ासनगर (बेळंकी) शाळेत तर मागील तीन वर्षांपासून टीव्हीवर ई-क्लास सुविधा उपलब्ध केली होती. आता तेथे प्रोजेक्टरवर ई-लर्निंगचे धडे मिळणार असून, प्रोजेक्टर खरेदीचे काम अंतिम टप्प्यात आहे. मागील वर्षभरात सानपवस्ती शाळा (बेडग), गवरदेवीवाडी (बेडग), खटाव केंद्रशाळा, सलगरे शाळा क्र. १ व २, चाबुकस्वारवाडी, बेडग, कदमवाडी (बेळंकी) आदी शाळांनी प्रोजेक्टर खरेदी केली होती, तर याहीवर्षी ई-लर्निंगसाठी एरंडोलीसह तालुक्याच्या पूर्व भागात सुमारे २० शाळांनी ई-लर्निंगचा वापर करून शिक्षण देता येईल, अशी व्यवस्था केली आहे.
मात्र या ई-लर्निंग सादरीकरणासाठी आवश्यक प्रोजेक्टरसाठी शासनस्तरावर स्वतंत्र तरतूद नसल्याने शाळांनाच पुढाकार घ्यावा लागला आहे. काही शाळांतून शैक्षणिक उठावातून, काही शाळांत शिक्षकांनी स्वत: तरतूद करून, काही शाळांत पालकांकडून भेट स्वरूपात प्रोजेक्टर खरेदी करण्यात आले आहेत. या प्रोजेक्टरद्वारे आता पेनड्राईव्हच्या माध्यमातून सॉफ्टवेअर डाऊनलोल करून शैक्षणिक माहिती, शैक्षणिक चित्रपट, अभ्यासक्रम दाखविले जात आहेत. सॉफ्टवेअर खरेदीसाठीही शाळांकडे स्वतंत्र तरतूद नसल्याने त्यासाठीही शिक्षक, व्यवस्थापन समिती व पालकांच्या सहकार्याने व्यवस्था केली जात आहे.
ई-लर्निंगच्या माध्यमातून शाळेत खडू-फळ्याबरोबरच व्हिडीओ लर्निंगचा आधार घेत दृकश्राव्य चित्रफिती, चित्रे यांच्या माध्यमातून सजविलेल्या धड्यांचे सॉफ्टवेअर वापरून ग्रामीण भागातील शिक्षण अधिकाधिक दर्जेदार होत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा यामध्ये आघाडीवर आहेत.