लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : आधीच कोरोनामुळे उपासमारीशी सामना कराव्या लागणाऱ्या जिल्ह्यातील रिक्षाचालकांना आता इंधन दरवाढीचे चटकेही सहन करावे लागत आहेत. दररोज होणाऱ्या दरवाढीने या चालकासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसल्याने अनेक रिक्षाचालकांनी हा व्यवसायच बंद करून रोजंदारीवर गेले, तर काहीजण दिवसभर अन्य काम आणि रात्री रिक्षा चालवून कुटुंबाचा खर्च भागवत आहेत.
जिल्ह्यात जवळपास साडेनऊ हजारच्या आसपास रिक्षाचालक आहेत. बहुतांश रिक्षाचालकांचा उदरनिर्वाहाचे ते एकमेव साधन आहे. आठ ते दहा वर्षी हा व्यवसायही मोठा प्रतिष्ठेचा होता. उत्पन्नही चांगले मिळत होते. पण, वाहनांची वाढत्या संख्येमुळे हा व्यवसायही आता अडचणीत आला आहे. त्यात गेल्या वर्षी कोरोनामुळे सात ते आठ महिने संपूर्ण व्यवसायच बंद होता. लाॅकडाऊननंतर थोडाफार व्यवसाय रुळावर येईल, असे वाटत असतानाच इंधनाचे दर भडकले.
बँकांची थकीत कर्जे, मुलांचे शिक्षण, कुटुंबाच्या खर्चाचा ताळमेळ घालताना या रिक्षाचालकांची कसरत होत आहे. त्यातून उत्पन्न घटल्याने काही रिक्षाचालकांनी बांधकामावर रोजंदारीने काम पत्करले आहे, तर काहीजण फळ, भाजी विक्रीचा व्यवसाय करू लागले आहेत. काहीजण दिवसभर मिळेल ते काम करून रात्री रिक्षा चालवीत आहेत.
चौकट
दरवाढीचा व्यवसायावर मोठा परिणाम
गेल्या तीन महिन्यांत इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. त्याचा परिणाम रिक्षा व्यवसायावरही झाला आहे. पूर्वी दिवसभरात तीनशे ते चारशे रुपये मिळत होते. ते आता दोनशे रुपयांच्या घरात आले आहे. त्यामुळे अनेकांनी रिक्षा बंद ठेवल्या आहेत.
चौकट
पैसे उरत नसल्याने करावे लागते इतर काम
कोरोनापूर्वी रिक्षाचालक दिवसभरात तीनशे ते चारशे रुपये मिळत होता; पण आता इंधन दरवाढीने त्याचे कंबरडे मोडले आहे. जवळपास २० टक्के रिक्षाचालकांनी हा व्यवसायच बंद केला आहे. काहीजण भाजीपाला, फळे विक्रीचा व्यवसाय करीत आहेत, तर काही सेंट्रिंगच्या कामावर जात आहेत. काहीजण दिवसभर रोजंदारीवर जाऊन रात्री रिक्षा फिरवत आहेत.
चौकट
कोट
इंधनवाढीचा मोठा फटका रिक्षाचालकांना बसला आहे. आधीच कोरोनामुळे प्रवाशांची संख्या घटली आहे. दिवसभरात रिक्षा थांब्यावर थांबून राहावे लागते. त्यानंतर कुठे एखादे भाडे मिळते. त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाहही चालत नाही. राज्य शासनाने इतरांना मदत केली; पण रिक्षाचालकांना दमडीही दिली नाही. बँकेकडून तगादा सुरू आहे. आरटीओकडून कारवाई होत आहे. आम्हाला कुणीच वाली नाही. - महादेव पवार, अध्यक्ष रिक्षाचालक संघटना
चौकट
कोट
मी बी.ए., बी.पी.एड.चे शिक्षण घेतले. पण, नोकरी न मिळाल्याने रिक्षाचा व्यवसाय सुरू केला. त्यावर आमचे कुटुंब चालते. दिवसभर रिक्षा चालविल्यावर चारशे, पाचशे रुपये मिळतात. त्यातून कर्जाचे हप्ते कुटुंबाचा खर्च भागवावा लागतो. आता इंधनवाढीने उत्पन्नात घट झाली आहे. कुटुंबाचा दैनंदिन खर्च कसा भागवायचा असा प्रश्न आहे. - सुलेमान शेख, रिक्षाचालक
चौकट
कोट
कोरोनानंतर इंधन दरवाढीचे चटके रिक्षाचालकांना बसत आहेत. त्यात ऑनलाईन परमीट सुरूच असल्याने नव्याने रिक्षाची भर पडत आहे. बँकेकडूनही कर्जाच्या हप्त्याच्या तगादा सुरू आहे. सध्या दिवसभरात दोनशे, तीनशे रुपये मिळविणेही जिकिरीचे झाले आहे. घराचा खर्च भागविताना मुलांच्या शाळेची फीही भरता आलेली नाही. रिक्षाचालकांना खऱ्या अर्थाने मदतीची गरज आहे. - महेश चौगुले, रिक्षाचालक
चौकट
पेट्रोल, डिझेलचे दर (प्रतिलिटर)
डिसेंबर : पेट्रोल ८९.०३, डिझेल ७७.८४
जानेवारी : पेट्रोल ९०.३५, डिझेल ७९.३४
फेब्रुवारी : पेट्रोल ९२.८७, डिझेल ८२.०८