सांगली : सकाळच्यावेळी लहान मुलांना खिडकीतून किंवा भेट दरवाजातून घरात सोडून त्यांच्यामार्फत चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात संजयनगर पोलिसांना गुरुवारी सकाळी यश आले. टोळीचा कणा असलेला आठ वर्षाच्या मुलगा चोरी करताना रंगेहाथ सापडला आहे. त्याच्यासोबत एक मुलगीही आहे. दोघे काहीच बोलत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेणे पोलिसांना आव्हान बनले आहे.जुना कुपवाड रस्त्यावरील राजीव गांधीनगर येथे गुरुवारी सकाळी एका घरात टेबलवरील मोबाईल चोरताना घरातील लोकांनीच या आठ वर्षाच्या मुलास पकडले. तो सापडल्याचे लक्षात येताच त्याच्यासोबत असलेल्या मुलीने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण तत्पूर्वीच घरातील लोकांनी तिलाही पकडले. ती अंदाजे १३ वर्षाची आहे. त्यांच्या ताब्यातील दोन मोबाईल काढून घेतले.
दोघांनाही संजयनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांना पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली. पण ते काहीच बोलत नाही. ठाणे अंमलदाराच्या खोलीत त्यांना बसविण्यात आले होते. त्यांच्याजवळ एक फडक्याचे गाठोडे मिळाले आहे. त्यामध्ये कपडे आहेत. दोघांकडे कुठे राहता? तुमचे आई-वडील कुठे आहेत? याबद्दल विचारणा केली. पण ते काहीच बोलत नाहीत. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेणे आव्हान बनले आहे.दोन्ही मुलांना बाल न्यायाधिकरण समितीपुढे उभे केले जाणार आहे. समितीच्या माध्यमातून पालकांचा शोध घेतला जाणार आहे. त्यांच्याकडून प्रलंबित गुन्ह्यांचा छडा लागेल, अशी पोलिसांना आशा आहे. दोघांच्या अंगावर मळकट कपडे आहेत. पायात चप्पलही नव्हते. कदातिच त्यांच्यासोबत पालक असण्याची शक्यता आहे. मात्र मुले सापडल्याचे लक्षात येताच ते पळून गेले असण्याची शक्यता आहे.चोरीच्या अनेक घटनागेल्या काही महिन्यापासून शहरात सकाळच्यावेळी अलिशान बंगले, फ्लॅट व घरातून सकाळच्यावेळी लॅपटॉप, मोबाईल, कपड्याच्या खिशातील पाकीट व रोकड लंपास केल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत.
या घटनांची पोलिस दप्तरी नोंदही झाली आहे. पण पोलिसांना त्यांचा छडा लावता आलेला नाही. लहान मुलांकडून अशाप्रकारची चोरी करुन घेतली जात असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले होते.