अमोल कुदळेदुधगाव : मिरज पश्चिम भागातील आठ गावे इस्लामपूर मतदार संघात समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यावेळेपासून या आठ गावांतून ज्या उमेदवाराला मतांचे अधिक्य मिळाले, तो विजयी, असे समीकरणच बनले आहे. त्यामुळे या आठ गावांवर सर्वच इच्छुक उमेदवारांनी लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे येत्या निवडणुकीत या गावांमधून मतदानासाठी मोठी चुरस दिसणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेससाठी अर्थात आमदार जयंत पाटील यांच्यासाठी नेहमीच सोपी असणारी इस्लामपूर मतदार संघातील विधानसभेची निवडणूक यावेळी चुरशीने होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
यासाठी भाजपने व्यूहरचना आखली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात भाजपकडून नेमके कोण लढणार, हे स्पष्ट झालेले नाही.तरीही भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत भोसले—पाटील यांनी गत वर्षभरापासूनच ह्यआपलीच उमेदवारीह्ण असणार हे मानून मतदार संघातील संपर्काला सुरुवात केली आहे. इस्लामपूर शहरासह गावोगावी त्यांनी कार्यकर्त्यांची फळी तयार करीत आपला गट उभारला आहे.
मिरज पश्चिम भागातील दुधगाव, सावळवाडी, माळवाडी, कवठेपिरान, कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, समडोळी, तुंग या गावांचा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात समावेश आहे. यामुळे मिरज पश्चिम भागातील मोठी ह्यव्होट बँकह्ण असलेल्या या गावांतील मतदानावर इस्लामपूर मतदार संघाची मदार आहे. हे जाणूनच नेतेमंडळी या परिसरावर प्रेम दाखवितात. आॅगस्ट महिन्यात आलेल्या महापुरावेळीही आमदार जयंत पाटील, इस्लामपूरचे निशिकांत पाटील यांनी या भागातील जनतेला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला होता. संसारोपयोगी साहित्यासह जनावरांच्या पशुखाद्यापर्यंत लोकांना मदत केली आहे. तसेच निशिकांत पाटील यांनी, तर मौजे डिग्रज गावच दत्तक घेतले आहे.
एकूणच मिरज पश्चिम भागातील ही आठ गावे ही महत्त्वाची असल्याने आमदार जयंत पाटील आणि निशिकांत पाटील या दोघांनीही या गावांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकांवर जोर दिला असून, काहीही झाले तरी या भागातून मतांचे अधिक्य मिळावे, यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यात आली आहे.