नऊ फुकट्या प्रवाशांमुळे सात वाहकांवर अपहाराची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:50 AM2021-02-21T04:50:12+5:302021-02-21T04:50:12+5:30
वाहकांची नजर चुकवून प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी एस. टी.च्या सांगली विभागाने सात विशेष भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. ...
वाहकांची नजर चुकवून प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी एस. टी.च्या सांगली विभागाने सात विशेष भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. सोमवार, दि. १५ ते २५ फेब्रुवारी दरम्यान यासाठी विशेष मोहीम राबवली आहे. यामुळे एस. टी.तून फुकट प्रवास करणाऱ्यांना लगाम बसणार आहे.
एस. टी. महामंडळाचे सांगलीचे प्रभारी विभाग नियंत्रक अरुण वाघाटे म्हणाले की, विनातिकीट प्रवास करणारे आणि वाहकांचा गैरकारभार थांबविण्यासाठी विभागीय स्तरावर शाखाप्रमुख, पर्यवेक्षकीय कर्मचारी यांची सात पथके तयार केली आहेत. या पथकाने पाच दिवसांमध्ये ४६६ बसेसची तपासणी केली होती. यामध्ये नऊ प्रवासी विनातिकीट प्रवास करताना पथकाला आढळून आले आहेत. याप्रकरणी विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तिकिटाचे पैसे आणि दंड अशी रक्कम वसूल केली आहे. तसेच सात वाहकांवर अपहाराची कारवाई करण्यात येणार आहे. यापुढे प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये आणि वाहकांनीही विनातिकीट प्रवास कोण करत आहे का, याची पाहणी केली पाहिजे. यामध्ये वाहकांनी दुर्लक्ष केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
चौकट
अशी होणार वसुली
एस. टी.चे तपासणी पथक २४ तास काम करणार असून, ही विशेष मोहीम संपल्यानंतरही प्रवाशांचे तिकीट प्राधान्याने तपासले जाणार आहे. त्यासाठी नेमलेली सात पथके कायमस्वरूपी कार्यरत राहतील. १०० रुपयांच्या आत तिकीट असल्यास १०० रुपये दंड व तिकिटाची रक्कम असे पैसे आकारण्यात येतील, तर १०० रुपयांच्या वर तिकीट असल्यास दुप्पट रकमेची आकारणी करण्यात येईल, अशी माहितीही अरुण वाघाटे यांनी दिली.