पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत वाढविले, जुन्या गाड्यांची इंजिने जाम होण्याचा धोका
By संतोष भिसे | Published: December 6, 2024 12:24 PM2024-12-06T12:24:59+5:302024-12-06T12:25:41+5:30
संतोष भिसे सांगली : सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी पेट्रोलमधील इथेनॉलचे मिश्रण २० टक्क्यांपर्यंत वाढविले आहे. परिणामी पेट्रोलपंपांवर लालभडक रंगाचे ...
संतोष भिसे
सांगली : सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी पेट्रोलमधील इथेनॉलचे मिश्रण २० टक्क्यांपर्यंत वाढविले आहे. परिणामी पेट्रोलपंपांवर लालभडक रंगाचे पेट्रोलचे वितरण सुरू झाले आहे. नव्या तेलाच्या वापरातून जुन्या मॉडेलच्या वाहनांची इंजिने जाम होण्याचा धोका वाढला आहे.
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत १ डिसेंबरपासून अतिरिक्त इथेनॉलच्या पेट्रोलचा पुरवठा पूर्ण क्षमतेने सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात भारत पेट्रोलियमच्या पंपांवर लाल रंगाचे तेल मिळत असून, पुढील टप्प्यात हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑइल कंपन्यांच्या पंपांवरही ते उपलब्ध होणार आहे. तांत्रिक भाषेत इथेनॉल ब्लेण्डेड मोटर स्पिरीट (इबीएमएस) नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पेट्रोलमध्ये आता इथेनॉलचे प्रमाण २० टक्के असेल. तत्पूर्वी ते १५ टक्के होते.
केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार पाच टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. इथेनॉल वाढविल्यानंतर त्याचा रंग लालभडक तथा कोकमसारखा झाला आहे. यापूर्वी ते नारंगी होते. तेलाचा रंग बदलल्याने पंपांवर ग्राहकांकडून शंका-कुशंका उपस्थित करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी खुलासा करण्याची, तसेच पंपांवर माहिती फलक लावण्याची मागणी होत आहे.
इथेनॉलचे प्रमाण वाढल्याने जुन्या बनावटीच्या इंजिनांबाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन पंपचालकांनी केले आहे. या पेट्रोलमध्ये काही थेंब पाणी जरी मिसळले, तरी त्याची जेली तयार होते, त्यामुळे गाडीचे इंजिन तत्काळ ब्लाॅक होते. बीएस ६ श्रेणीतील दुचाकींना मात्र याचा फटका बसणार नाही. त्यामुळे जुन्या बनावटीच्या वाहनाच्या मालकांनी टाकीमध्ये पाणी मिसळणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन पंपचालकांनी केले आहे.
खासगी पंपांवर नारंगीच पेट्रोल
खासगी कंपन्यांच्या पंपांवर मात्र नारंगी रंगाचेच पेट्रोल मिळणार आहे. या पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल नाही.
सर्वच सरकारी तेल कंपन्यांनी महिन्याभरापासून ई-२० श्रेणीतील पेट्रोलचा पुरवठा सुरू केला आहे. यामध्ये इथेनॉलचे प्रमाण १५ टक्क्यांवरून २० टक्के केले आहे. त्याचा रंगही लाल आहे. ग्राहकांनी नवे पेट्रोल वापरताना गाडीच्या इंधन टाकीमध्ये पाणी जाऊ नये याची दक्षता घेणे आवश्यक आहे. वाहनांच्या कार्यक्षमतेसाठी नवे पेट्रोल फायद्याचेच आहे. - सुरेश पाटील, जिल्हाध्यक्ष, पेट्रोल डीलर्स असोसिएशन, सांगली