सांगली : दिव्यांग व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती सामान्य व्यक्तीच्या तुलनेत कमी असल्याने कोरोनाचा धोका अधिक आहे. ही बाब लक्षात घेत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयीन उपस्थितीतून सूट दिली आहे. तसेच लसीकरण, उपचारात रांगेत न थांबविता प्राधान्याने उपचार करावेत, असे परिपत्रकही मुंडे यांनी जिल्हा परिषदेला पाठविले आहे.
विविध शासकीय कार्यालयांमध्ये अगोदरच १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम करण्याची असलेली मुभा लक्षात घेत राज्य शासन सेवेतील दिव्यांग अधिकारी- कर्मचाऱ्यांनादेखील कार्यालयीन उपस्थितीतून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात येऊन पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत दिव्यांग अधिकारी व कर्मचारी यांना उपस्थितीत सूट देण्यासह दिव्यांग व्यक्तिंना कोरोना टेस्टिंग, उपचार व लसीकरणात प्राधान्य देणे, हे दोन्ही दिलासादायक निर्णय धनंजय मुंडे यांनी घेतले आहेत, अशी माहिती प्रहार दिव्यांग संघटनेचे उपाध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.