राष्ट्रवादी-भाजपच्या दोस्तीपुढं जतच्या काँग्रेसचा त्रागा निष्फळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:18 AM2021-07-04T04:18:15+5:302021-07-04T04:18:15+5:30
कारण-राजकारण श्रीनिवास नागे जत तालुक्यातील ६५ गावांना पाणी देण्यातल्या कुरघोड्या, नगरपालिकेतली झोंबाझोंबी आणि सतत पायात पाय घालण्यामुळं काँग्रेसचे आमदार ...
कारण-राजकारण
श्रीनिवास नागे
जत तालुक्यातील ६५ गावांना पाणी देण्यातल्या कुरघोड्या, नगरपालिकेतली झोंबाझोंबी आणि सतत पायात पाय घालण्यामुळं काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत आणि काँग्रेसजन वैतागलेत. हे उद्योग विरोधातल्या भाजपपेक्षा महाआघाडीतल्या मित्रपक्ष राष्ट्रवादीचेच जास्त. त्यातूनच भाजप-राष्ट्रवादीच्या दोस्तीचा दुसरा अध्याय सुरू झालाय. काही काळापूर्वी काँग्रेसनं जे केलं, तेच राष्ट्रवादी करतेय. फक्त तालुक्यातल्या नेत्यांचे चेहरे आणि पट बदललाय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या इशाऱ्याशिवाय हे घडणं शक्य नाही. त्यामुळं काँग्रेसच्या नेत्यांंचा त्रागा व्यर्थ ठरणार आहे.
जत तालुक्यात दुसऱ्या-तिसऱ्या फळीतले बहुसंख्य नेते पक्षापेक्षा व्यक्तीवर निष्ठा ठेवून असतात. सोयीस्कर भूमिका हा त्यांचा स्थायीभाव. त्यामुळं त्यांची दोस्ती किंवा दुश्मनी व्यक्तीसापेक्ष ठरते. काँग्रेस-राष्ट्रवादीचं इथं कधीच जमलं नाही. २००९ मधल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतून उभ्या असलेल्या विलासराव जगतापांना काँग्रेसनं दगा दिला. तालुक्यातला काँग्रेस पक्ष विसर्जित करून या नेत्यांनी भाजपच्या प्रकाश शेंडगेंना बळ देत तेरा दिवसांत आमदार केलं. नंतर भाजपमध्ये गेलेल्या जगतापांनी २०१४ मध्ये याच नेत्यांना हाताशी धरून आमदारकी मिळवली. २०१९ मध्ये विक्रम सावंत यांनी जगतापांना पाडून काँग्रेसचा झेंडा फडकावला, पण तेव्हा राष्ट्रवादीनं त्यांच्या विरोधात काम केलं होतं. तेव्हापासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून सावंत यांचं खच्चीकरण सुरू झालंय.
कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे विक्रम सावंत हे मावसबंधू. कदम यांच्याकडं जिल्ह्यातल्या काँग्रेसची, तर जयंत पाटील यांच्याकडं राष्ट्रवादीची सूत्रं. दोन्ही पक्ष वरवर हातात हात घालून चाललेत, पण खाली मात्र पायात पाय! स्वत:चा पक्ष वाढवताना कोणताच विधिनिषेध पाळायचा नाही, ही सगळ्याच पक्षांची रीत. जतमधली ६५ गावं म्हैसाळ योजनेपासून वंचित आहेत. त्यांना कर्नाटकमधल्या तुबची-बबलेश्वर योजनेतून पाणी देण्याचा आमदार सावंत यांचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून पद्धतशीर हाणून पाडला जातोय. जयंत पाटील यांच्याकडेच जलसंपदा खातं असून, त्यांनी ती योजना अव्यवहार्य ठरवलीय. कर्नाटकनं पुढं केलेली दुसरी योजनाही बाजूला सारून आता ‘म्हैसाळ’च्या सुधारित योजनेचा प्रस्ताव पुढं आणला जातोय. राष्ट्रवादीच्या ओंजळीनंच पाणी देण्याचा हा घाट! एकीकडं सावंत यांचं खच्चीकरण, तर दुसरीकडं भाजपमध्ये नाराज असलेल्या जगतापांना राष्ट्रवादीत आणून पुनर्वसन, ही त्यामागची खेळी. तत्पूर्वी भाजपमध्ये गेलेल्या दुसऱ्या-तिसऱ्या फळीतल्या संधिसाधूंना राष्ट्रवादीत घेतलं जातंय. विक्रम सावंतांवर तुटून पडायचं, हाच या सगळ्यांचा एककलमी कार्यक्रम.
काँग्रेसनं नगरपालिकेतल्या सत्तेचा वाटा राष्ट्रवादीला दिलाय, पण राष्ट्रवादीकडून पालिकेच्या कामांचे नारळ जगतापांच्या हस्ते फोडले जाताहेत. हा या दोस्तीचा पुढचा अध्याय.
या घुसमटीतून बाहेर पडण्याच्या धडपडीतून काँग्रेसच्या नेत्यांनी सांगलीत येऊन राष्ट्रवादीबद्दल त्रागा व्यक्त केला. जयंत पाटील यांच्याकडं तक्रार करणार असल्याचं सांगितलं. प्रदेशाध्यक्षांच्या संमतीशिवाय तिथं राष्ट्रवादीचं पानही हलत नाही, तर मग तिथले नेते पाटील यांच्या इशाऱ्याशिवायच मित्रपक्ष काँग्रेसला पाण्यात पाहत असतील का?
जाता-जाता : जतमधल्या काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवताना जयंत पाटील यांच्यावर मात्र कौतुकाची सुमनं उधळली. हा आदरयुक्त दरारा की राजकीय दहशत म्हणायची! जयंत पाटील यांच्याकडं जलसंपदासह पालकमंत्रिपदही आहे. त्याचा हा परिणाम.
चौकट
साखर कारखान्यांमुळं नाखुषीची पायाभरणी
जतचा बंद पडलेला डफळे साखर कारखाना आता जयंत पाटील यांच्या राजारामबापू कारखान्याच्या ताब्यात आलाय. त्याच्या हंगामाची सुरुवात करेपर्यंत विश्वजित कदम आणि विक्रम सावंत यांनी तालुक्यात दोन खासगी साखर कारखान्यांची पायाभरणी केली. नाखुषीचं तेही कारण असावं, बहुधा.