एसटीच्या सेवेतून खासगी शिवशाही गाड्यांना निरोप, ३० जूनच्या रात्री पूर्णत: सेवा बंद

By संतोष भिसे | Published: July 1, 2023 02:03 PM2023-07-01T14:03:37+5:302023-07-01T14:09:01+5:30

महामंडळासोबतचा करार न वाढल्याने खासगी शिवशाही गाड्यांना ‘ब्रेक’ लागला

Farewell to private Shivshahi trains from the service of ST | एसटीच्या सेवेतून खासगी शिवशाही गाड्यांना निरोप, ३० जूनच्या रात्री पूर्णत: सेवा बंद

एसटीच्या सेवेतून खासगी शिवशाही गाड्यांना निरोप, ३० जूनच्या रात्री पूर्णत: सेवा बंद

googlenewsNext

संतोष भिसे

सांगली : एसटी महामंडळाला शिवशाही गाड्या पुरविणाऱ्या खासगी कंपनीचा करार शुक्रवारी (दि. ३०) संपुष्टात आला. त्यामुळे प्रवाशांना थंडगार प्रवास घडवणाऱ्या खासगी शिवशाही गाड्या आता राज्यभरातील रस्त्यांवर दिसणार नाहीत. फक्त महामंडळाच्या गाड्याच सेवा देणार आहेत.

महामंडळासोबतचा करार न वाढल्याने खासगी शिवशाही गाड्यांना ‘ब्रेक’ लागला. खासगी आरामगाड्यांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी संपूर्ण वातानुकूलित शिवशाही गाड्यांची संकल्पना एसटी महामंडळाने अंमलात आणली होती. २०१८ पासून राज्यभरात शिवशाहीची दौड सुरू झाली होती. थोड्याफार जादा पैशांत थंडगार व आरामदायी प्रवास करता येत असल्याने प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला. 

विशेषत: पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नागपूर आदी मार्गांवर शिवशाही भरभरून धावत होत्या. २०२१ मध्ये करार संपल्याने महामंडळाने तीन वर्षांची मुदतवाढ दिली होती, तीदेखील ३० जूनच्या रात्री संपली. गेल्या महिनाभरात कंपनीने १०० गाड्या टप्प्याटप्प्याने एसटीच्या सेवेतून काढून घेतल्या. ३० जूनच्या रात्री पूर्णत: सेवा बंद केली. त्यांचे काही चालक कंत्राटी स्वरूपात एसटीकडे रुजू झाले.

या मार्गावर होती शिवशाही

पुणे-मुंबई, मिरज-सांगली-पुणे, पुणे-नाशिक, कोल्हापूर-पुणे, सोलापूर-पुणे, सातारा-बोरीवली, पिंपरी-पणजी, बार्शी-पुणे, पुणे-महाबळेश्वर आदी मार्गांवर खासगी शिवशाही धावत होत्या. आता तेथे महामंडळाच्या गाड्या धावतील. खासगी गाड्या तुलनेने तंदुरुस्त होत्या, त्यामुळे महामंडळालाही आपल्या शिवशाहीच्या तंदुरुस्तीवर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

प्रतिकिलोमीटर २९ रुपये शुल्क

खासगी शिवशाही गाड्यांना एसटीकडून प्रतिकिलोमीटर २९ रुपये शुल्क दिले जायचे. त्याशिवाय डिझेल पुरवठा आणि वाहक एसटीचा असायचा. गाडीची देखभाल-दुरुस्ती, स्वच्छता व चालक ही जबाबदारी संबंधित कंपनीची होती.

आता येणार शिवाई

खासगी शिवशाहीची उणीव भरून काढण्यासाठी आता शिवाई गाड्या येणार आहेत. काही आगारांत त्या दाखलही झाल्या आहेत. या गाड्या विजेवर धावणाऱ्या असून, संपूर्ण वातानुकूलित आहेत.


खासगी कंपनीने करार संपल्याने गाड्या काढून घेतल्या. त्या मार्गांवर आता महामंडळाच्या गाड्यांचे नियोजन केले आहे. - धनाजी घाटगे, वरिष्ठ आगार व्यवस्थापक, सांगली

Web Title: Farewell to private Shivshahi trains from the service of ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.