बागायती पट्ट्यात वन्यप्राण्यांच्या एन्ट्रीने शेतकरी धास्तावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:22 AM2021-04-03T04:22:42+5:302021-04-03T04:22:42+5:30
सांगली : जिल्हाभरात उसाची शेती रिकामी झाल्याने वन्यप्राण्यांनी गावांकडे मोर्चा वळविला आहे. गेल्या महिन्याभरात तासगाव, मणेराजुरी, म्हैसाळ भागात गव्यांनी ...
सांगली : जिल्हाभरात उसाची शेती रिकामी झाल्याने वन्यप्राण्यांनी गावांकडे मोर्चा वळविला आहे. गेल्या महिन्याभरात तासगाव, मणेराजुरी, म्हैसाळ भागात गव्यांनी धिंगाणा घातला, तर बुधवारी चक्क सांगलीत बिबट्यानेच एन्ट्री केली.
जिल्ह्यात वनक्षेत्र तुलनेने तीन टक्के इतकेच आहे. तरीही चांदोली, सागरेश्वर, दंडोबा येथे वन्यप्राणी मुबलक आहेत. चांदोलीमध्ये तब्बल ५३ बिबटे असल्याची नोंद आहे. त्यातील बहुतांश उसाच्या शेतीत दिसतात, असा प्राणीप्रेमींचा अनुभव आहे. बिबट्याचा प्रजनन कालावधी ९० दिवस असतो. त्यामुळे उसाच्या गर्द शेतीत जन्म आणि तेथेच राहण्याने, ऊसशेती हेच त्याचे घर बनत आहे. पण ऑक्टोबरपासून उसाची तोड सुरू होताच राने रिकामी पडतात आणि त्यातून बिबट्यांसह वन्यप्राणी बाहेर पडतात.
वन विभागाक़डील नोंदींनुसार २०१६ पासून वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात आठजण मरण पावले आहेत, तर १९ जण जखमी झाले आहेत. अर्थात कागदावर न आलेले आकडे याहून अधिक आहेत. उसाच्या शेतात साळिंदर, कोल्हे, लांडगे हेदेखील मोठ्या संख्येने आढळतात, यातील साळिंदरांची सर्रास शिकार होते, अन्य प्राणी पळून जाण्यात यशस्वी ठरतात. गेल्या काही दिवसांत गव्यांचा वाढलेला वावर हीदेखील शेतकऱ्यांची डोकेदुखीची बाब ठरली आहे. मणेराजुरीमध्ये पंधरवड्यापूर्वी दोन गव्यांनी द्राक्षबागेची नासधूस केली. ऊसशेती रिकामी झाल्याने ते बागायती शेतीत आले. वन्यप्राण्यांची शहरातील घुसखोरी बिबट्यापर्यंत वाढल्याने वन विभागाच्या सज्जतेची कसोटी लागली आहे.
चौकट
वन्यप्राण्यांसोबत जगायला शिकूया
बिबट्या हा वारंवार शहरात येणारा प्राणी नसला तरी, गव्यांच्या बाबतीत मात्र तसा अनुभव नाही. नदीकाठच्या शेतीत तो वरचे वर येऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये जागर आणि प्रशिक्षण आवश्यक ठरले आहे. वन्यप्राण्यांसोबत जगायला शिकण्याची वेळ आली आहे. सुदैवाने मानवी हल्ल्यात या प्राण्यांचा मृत्यू झाल्याचे उदाहरण अद्याप नाही, हीच काय ती जमेची बाजू आहे.