कुपवाड : कानडवाडी (ता. मिरज) येथील श्रीवर्धन कार्पोरेशन या सूतगिरणीला शाॅर्टसर्किटने आग लागून ६०० टन कापसाच्या गाठी, मशिनरी, इलेक्ट्रिक साहित्य, बिल्डिंग असे सुमारे ८ कोटींचे नुकसान झाले. रविवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आग आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेचे तीन, कुपवाड एमआयडीसीचा एक, तर तासगाव नगरपरिषदेचे एक असे पाच बंब व तीन पाण्याच्या टँकरच्या मदतीने अग्निशमन दलाचे जवान सकाळी आठपासून प्रयत्न करीत होते. तरीही आग आटोक्यात आली नव्हती.कानडवाडीमधील श्रीवर्धन कार्पोरेशन सूतगिरणीत रविवारी कामगार नेहमीप्रमाणे काम करीत होते. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अचानक शाॅर्टसर्किटने आग लागली. आग लागताच कामगार कंपनीतून बाहेर धावले. आग लागल्याचे समजताच माजी सरपंच अनिल शेगुणशे यांनी तातडीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन करून उच्च दाब वाहिनी व परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यास सांगितले. कंपनीशेजारील २५ हून अधिक घरातील गॅस सिलिंडर, जनावरे, ग्रामस्थांना तातडीने इतरत्र हलविण्यात आले. कंपनीत कापसाच्या गाठी असल्याने आगीने अल्पावधीत रौद्र रूप धारण केले. या घटनेची माहिती मिळताच कंपनीचे संचालक सूरज संजयकुमार मालू, कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू, नितीन मालू, सुशीलकुमार मालू यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.कुपवाड एमआयडीसी, सांगली, मिरज, कुपवाड महापालिका, तासगाव नगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे पाच बंब व जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने तीन पाण्याचे टँकर मागविण्यात आले. पाण्याचा फवारा सतत चालू असतानाही आग आटोक्यात येत नव्हती. आगीच्या ज्वाळा व धूर आकाशात पसरला होता. चार ते पाच किलोमीटर अंतरावरून आकाशातील धूर दिसून येत होते. आगीत ६०० टन कापूस गाठी, सूतगिरणीतील कच्चा माल, मशिनरी, सूत आगीत जळून खाक झाले. कंपनीच्या छतावरील पत्रे, लोखंडी अँगल आगीत वितळून गेले. सकाळी आठ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करीत होते.
Sangli: कानडवाडीत सूतगिरणीस भीषण आग; ८ कोटींचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 1:03 PM