गुन्हे दाखल करा; पण दुकाने चालूच ठेवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:28 AM2021-04-07T04:28:10+5:302021-04-07T04:28:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी चालतील, पण दुकाने बंद ठेवून आम्ही आमचे वाटोळे करून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी चालतील, पण दुकाने बंद ठेवून आम्ही आमचे वाटोळे करून घेणार नाही, अशी भूमिका व्यापारी संघटनांनी मंगळवारी आयुक्तांबरोबर झालेल्या बैठकीत स्पष्ट केली.
आयुक्त नितीन कापडणीस यांच्याबरोबर महापालिकेच्या सभागृहात व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक मंगळवारी पार पडली. यावेळी आयुक्तांनी कोरोनाच्या निर्बंधांचे व्यापाऱ्यांनी पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन केले. त्यावर व्यापाऱ्यांनी इन्कार दर्शविला. व्यापार बंदला पूर्णपणे विरोध केला. बंद करायचा तर सर्वच बंद करा; अन्यथा सर्व सुरू करा, अशी मागणी त्यांनी केली. व्यापारपेठा बंद ठेवून आम्ही आमचे वाटोळे करून घेणार नाही, प्रसंगी आमच्यावर गुन्हे दाखल करा; पण आम्ही दुकाने सुरूच ठेवणार, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला. यावर आयुक्तांनी तुमच्या भावना सरकारला कळवू, प्रशासनाला सहकार्य करून सर्व आस्थापना बंद ठेवा, असे आवाहन केले.
शासनाच्या आदेशाला सांगलीतील हरभट रोड, कापड पेठ, सराफ असोसिएशन, बालाजी चौक यांसह सर्व ठिकाणच्या व्यापारी संघटनांनी विरोध दर्शवत दिवसभर व्यापार सुरूच ठेवला. त्यामुळे आयुक्त कापडणीस यांनी व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. या बैठकीस व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा, अतुल शहा, किराणा दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अरुण दांडेकर, विराज कोकणे, प्रसाद मद्भावीकर आदी उपस्थित होते.
समीर शहा म्हणाले की, ज्या दुकानात गर्दी होत नसते अशीच दुकाने बंद ठेवण्याची सक्ती केली जात आहे. बीअरबार, भाजीपाला विक्रीच्या ठिकाणी नागरिक आणि ग्राहक मोठ्या संख्येने एकत्र येतात त्या ठिकाणी बंद नाही. हा अन्याय नाही काय? आम्ही कोरोनाचे नियम पाळून व्यापार करायला तयार आहोत, मात्र महिनाभर व्यापार बंदचे आदेश आम्हाला मान्य नाहीत.
चौकट
व्यापारी आत्महत्या करतील.
आधीच महापूर, कोरोनामुळे व्यापार उद्ध्वस्त झाला आहे. ऑनलाइन व्यापारामुळे व्यापारी वर्गाचे कंबरडे मोडले आहे. त्यातच पुन्हा कोरोनामुळे दुकाने बंद ठेवायला लावत असाल तर आतापर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या अनुभवल्या आहेत. यापुढे व्यापारी वर्गाच्या आत्महत्या सुरू होतील, अशी भीती अनेक व्यापाऱ्यांनी आयुक्तांसमोर व्यक्त केली.