सांगलीत स्टेट बँकेला आग
By admin | Published: July 18, 2014 11:55 PM2014-07-18T23:55:43+5:302014-07-18T23:57:40+5:30
कागदपत्रे जळाली : दीड लाखाचे नुकसान
सांगली : येथील मुख्य बसस्थानकाजवळील स्टेट बँकेला आग लागली. यामध्ये महत्त्वाची कागदपत्रे फर्निचर, पंखे, कपाटे, खुर्च्या जळून खाक झाल्याने एक लाख ६३ हजाराचे नुकसान झाले आहे. आज (शुक्रवार) पहाटे तीन ते चार या दरम्यान ही घटना घडली. घटनेची रात्री उशिरा शहर पोलिसांत नोंद झाली.
स्टेट बँकेचे दुमजली कार्यालय आहे. पहिल्या मजल्यावर बँकेचे दैनंदिन व्यवहार चालतात. दुसऱ्या मजल्यावर महत्त्वाची कागदपत्रे ठेवण्यात आली आहेत. बँकेजवळ एटीएम सेवा आहे. पहाटे तीन वाजता दुसऱ्या मजल्यावरुन धुराचे लोट येत असल्याचे एटीएममधील रखवालदाराच्या निदर्शनास आले. त्याने आरडाओरड केल्याने परिसरातील लोक जमा झाले. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस व महापालिकेच्या अग्निशमन दलाची गाडी दाखल झाली. एका तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत महत्त्वाची कागदपत्रे, फायली, संगणक, फॅक्स मशीन, दूरध्वनी, टेबल, खुर्चा, कपाटे जळून खाक होऊन एक लाख ६३ हजाराचे नुकसान झाले आहे.
बँकेच्या व्यवस्थापिका आशा मोहन सोनवणे (रा. नेमीनाथनगर, सांगली) याही आगीचे वृत्त समजताच दाखल झाल्या होत्या. त्यांनी बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने आगीमध्ये काय नुकसान झाले आहे, याची माहिती घेतली. त्याची यादी तयार केली. शहर पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
बँकेत आग कशाने लागली? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनाही आगीचे कारण समजू शकले नाही. एटीएममधील रखवालदाराच्या प्रसंगावधानामुळे हा प्रकार तातडीने उघडकीस आला. अन्यथा बँकेच्या पहिल्या मजल्यापर्यंत आग वाढली असती.