सांगलीत भारतातील पहिल्या फिरत्या समवशरणास प्रारंभ : षोडशकरण व दशलक्षण पर्वाचा विशेष कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 11:04 PM2018-09-10T23:04:29+5:302018-09-10T23:07:14+5:30
चातुर्मासामध्ये षोडशकरण व दशलक्षण पर्वाच्या विशेष कार्यक्रमास सोमवारपासून प्रारंभ झाला. नेमिनाथनगरमध्ये उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली.
सांगली : चातुर्मासामध्ये षोडशकरण व दशलक्षण पर्वाच्या विशेष कार्यक्रमास सोमवारपासून प्रारंभ झाला. नेमिनाथनगरमध्ये उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली. यानिमित्त उभारण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण व भारतातील पहिल्याच फिरत्या समवशरणामध्ये तीर्थंकर भगवंतांची पूजा सुरू झाली.
दिगंबर जैनाचार्य संत शिरोमणी विद्यासागरजी महाराज यांचे शिष्य नियमसागरजी महाराज, प्रबोधसागरजी महाराज, वृषभसागरजी महाराज, अभिनंदनसागरजी महाराज व सुपार्श्वसागरजी महाराज यांचा यावर्षीचा संयम स्वर्ण वर्षायोग सध्या सुरू आहे. या मंगलमय पुण्यकाळातील चातुर्मासातील षोडशकरण व दशलक्षण पर्वाचा हा विशेष कार्यक्रम आहे सकाळी सात वाजता सुहास पाटील (गोमटेश) यांच्याहस्ते ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी चातुर्मास कमिटीचे अध्यक्ष, माजी महापौर सुरेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
२७ फूट उंचीच्या भव्य फिरत्या, मनमोहक समवशरणाची रचना या कार्यक्रमाचे आकर्षण आहे. नियमसागरजी महाराजांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाखाली ही रचना करण्यात आली आहे. यामध्ये साडेपाच फूट उंचीचे तीर्थंकर भगवंतांच्या चार सुबक मूर्ती बसविण्यात आल्या आहेत.
या समवशरणामध्ये सहा विमानांची विशेष रचना करण्यात आली आहे. या कार्यक्रमावेळी विमानातून भगवंतांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. या कार्यक्रमासह सांगलीसह परिसरातील श्रावक-श्राविका मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
आज पुण्यतिथी कार्यक्रम
षोडशकरण पर्वातील प्रथम भावना ‘दर्शनविशुध्दी भावना’ यांची पूजा करण्यात आली. पूजेचा इंद्र-इंद्रायणीचा मान संदीप आवटी यांना मिळाला. दुपारी झालेल्या प्रवचनात नियमसागरजी महाराज यांनी दर्शनविशुध्दी भावनेचे महत्त्व सांगितले. मंगळवारी ‘विनयसंपन्नता भावना’ यांची पूजा तसेच प्रथमाचार्य शांतिसागर महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम होणार आहे.