अविनाश बाड ल्ल आटपाडीराज्यातील महायुती तुटली आणि आघाडी फाटली, त्यामुळे राज्यात राजकीय उलथापालथ होईलच, पण आटपाडी तालुक्याला मात्र स्वातंत्र्यप्राप्तीनंतर यंदा प्रथमच ‘छप्पर फाडके...’ मिळाले आहे. आटपाडीला प्रथमच राष्ट्रवादीतून अमरसिंह देशमुख यांना, तर भाजपमधून गोपीचंद पडळकर यांनी तिकीट मिळाले आहे.आजपर्यंत खानापूर-आटपाडी मतदारसंघावर खानापूरकरांचाच वरचष्मा राहिलेला आहे. राजकीय पक्षांचे तिकीटसुध्दा खानापूरकरांनाच मिळाले आहे. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर जिल्ह्यातून पहिल्यांदा राष्ट्रवादीला जाहीरपणे पाठिंबा देणाऱ्या राजेंद्रअण्णा देशमुख यांची राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी आजपर्यंत परवड केली. काँग्रेस असो की राष्ट्रवादी, आटपाडीकरांना आजपर्यंत या पक्षांनी कायम तिकिटापासून दूर ठेवले होते. त्यामुळे १९९५ मध्ये राजेंद्रअण्णांनी अपक्ष निवडणूक लढविली होती.आता जि. प.चे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी केली. हा मतदारसंघ आघाडीच्या वाटणीत काँग्रेसला गेला, त्यामुळे तिकीट मिळण्याचा प्रश्नच नव्हता. दुसरीकडे गोपीचंद पडळकर यांनीही अपक्ष म्हणून लढण्याचा निर्धार केला होता; मात्र राजकीय उलथापालथीत सध्या सर्वाधिक मागणी असलेले भाजपचे कमळ त्यांच्या हाती आले, तर देशमुख यांना प्रथमच राष्ट्रवादीने घड्याळ बांधले आहे.राष्ट्रवादी आणि भाजपने तिकीट दिल्याने या पक्षांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना आता आत एक आणि बाहेर दुसरी भूमिका घेता येणे शक्य नाही. खासदार संजय पाटील यांचा विसापूर मंडलमधील गट आणि मतदारसंघातील भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना थेट पडळकर यांनाच मदत करावी लागणार आहे, तर खानापूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा विसापूर मंडलमधील गट यांना अमरसिंह देशमुख यांचा प्रचार आणि मतांची मदत करावी लागणार आहे. त्यामुळे कॉँग्रेसचे उमेदवार सदाशिवराव पाटील यांना गेल्या निवडणुकीत ज्या विसापूर मंडलने मताधिक्य देऊन विजयश्री मिळवून दिली होती, तिथे या निवडणुकीत काय होते, याबाबत उत्सुकता लागली आहे. या निवडणुकीत प्रथमच चौरंगी सामना आणि तोही राजकीय पक्षांच्या चिन्हांवर होण्याची शक्यता असल्याने राजकीय गणितेही बदलण्याची शक्यता आहे, पण या विधानसभा निवडणुकीत प्रथमच आटपाडीचे दोन उमेदवार तेही पक्षांच्या तिकिटावर निवडणूक लढविणार आहेत, ही दिलाशाची गोष्ट आहे.विसापूर सर्कलकडे लक्षखानापूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा विसापूर मंडलमधील गट यांना अमरसिंह देशमुख यांचा प्रचार आणि मतांची मदत करावी लागणार आहे. त्यामुळे कॉँग्रेसचे उमेदवार सदाशिवराव पाटील यांना गेल्या निवडणुकीत ज्या विसापूर मंडलने मताधिक्य देऊन विजयश्री मिळवून दिली होती, तिथे या निवडणुकीत काय होते, याबाबत उत्सुकता आहे.राजेंद्रअण्णा देशमुख यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांसमोर उमेदवारीचे तिकीट कसले असते, ते एकदा दाखवा तरी, अशी मागणी केली होती. आता त्यांची मागणी पहिल्यांदा पूर्ण झाली आहे. विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांना गोपीचंद पडळकर यांनी सुमारे १५ दिवसांपूर्वी भाजपच्या तिकिटाची मागणी केली होती. त्यावेळी माजी आमदार अनिल बाबर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. तरीही तावडे यांनी मी तुमच्या हातात भाजपचे कमळ देणार, असा शब्द दिला होता. तो आता खरा ठरला आहे.
आटपाडीला प्रथमच राजकीय पक्षांची उमेदवारी
By admin | Published: September 29, 2014 12:24 AM