सांगलीत पाच दुकानदारांना ६० हजाराचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:25 AM2021-04-13T04:25:38+5:302021-04-13T04:25:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : मिनी लॉकडाऊनमधील नियमांचा भंग करून दुकाने सुरू ठेवल्याबद्दल सोमवारी महापालिका व पोलिसांनी कारवाईचा बडगा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मिनी लॉकडाऊनमधील नियमांचा भंग करून दुकाने सुरू ठेवल्याबद्दल सोमवारी महापालिका व पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. शहरातील पाच दुकानदारांवर कारवाई करत ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ‘ब्रेक द चेन’ या शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या अभियानानुसार अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळून अन्य कोणत्याही आस्थापना सुरू न करण्याचे आदेश दिले आहेत. तरीही सोमवारी काही आस्थापना सुरू झाल्या होत्या. उपायुक्त राहुल रोकडे, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी शहरात फिरून दुकानांवर कारवाई केली. यात सरगम, न्यू बालाजी, बालाजी कस्टम, तसेच न्यू संदीप मोबाईल आणि पॅराडाईज शूज या पाच दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ६० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोविड निवारणासाठी शासनाने दिलेल्या सूचनांनुसार सर्वांनी अत्यावश्यक सेवेच्या आस्थापना सोडून अन्य आस्थापना उघडू नयेत, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या कारवाईत आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे, सहायक आयुक्त एस. एस. खरात, अग्निशामक अधिकारी चिंतामणी कांबळे, पोलीस उपनिरीक्षक दीपक माने, रूपाली गायकवाड, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, स्वच्छता निरीक्षक प्रणिल माने आदींनी सहभाग घेतला.
चौकट
विनामास्क २७ जणांवर कारवाई
महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी माजी सैनिकांचा टास्क फोर्स तयार केला आहे. या टास्क फोर्सकडून मास्क न वापरणारे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. सोमवारी या टास्क फोर्सने विनामास्क फिरणाऱ्या २७ जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून ४२०० रुपये दंड वसूल केला.