जिल्ह्याचा आरोग्य व शिक्षणाचा दर्जा उंचावण्यावर लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:19 AM2021-06-21T04:19:19+5:302021-06-21T04:19:19+5:30
सांगलीत जिल्हा परिषदेतर्फे प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका प्रदान करण्यात आल्या. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, कृषी राज्यमंत्री ...
सांगलीत जिल्हा परिषदेतर्फे प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका प्रदान करण्यात आल्या. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे आदींची उपस्थिती होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात आरोग्य व शिक्षण यावर भर दिला असून, त्यांचा दर्जा उंचावण्यासाठी पाठपुरावा करीत असल्याची माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यावेळी उपस्थित होते.
३५ प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका प्रदान करण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी स्वागत केले. मंत्री पाटील म्हणाले की, चौदाव्या वित्त आयोगाचे व्याज शासनाला परत द्यावे लागत होते. त्याचा फायदा जिल्ह्यासाठी करून देण्याची युक्ती मुश्रीफ यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्याला त्यांनी ६५ रुग्णवाहिका दिल्या आहेत, त्यासाठी वित्त आयोगाचे व्याज वापरल्याचे सांगितले. सांगलीसाठीही प्रस्ताव ठेवला असता मुश्रीफ यांनी त्वरित मंजुरी दिली. यानंतर प्रत्येक तालुक्याला कार्डियाक रुग्णवाहिका देण्यासाठी प्रयत्न असेल. जत व आटपाडी तालुक्यांना प्राधान्य देऊ.
ते म्हणाले, प्राथमिक शिक्षणाच्या दर्जावर लक्ष देण्याची सूचना जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केली आहे. त्यानुसार १४१ शाळा मॉडेल स्वरूपात विकसित होत आहेत. शासनाच्या मदतीशिवाय लोकसहभागही घेतला जाईल. रोटरीलाही मदतीसाठी विनंती केली आहे.
मंत्री मुश्रीफ म्हणाले की, आरोग्यसेवेचा पाया मजबूत करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी अधिकाधिक निधी दिला जाईल.
अध्यक्षा कोरे यांनी स्वागत केले. आरोग्य व शिक्षण सभापती आशा पाटील यांनी प्रास्ताविक केले. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी शिक्षण व आरोग्यविषयक कामांचा आढावा घेतला.
कार्यक्रमाला सरदार पाटील, अरुण बालटे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, तानाजी लोखंडे, दत्ताजीराव पाटील आदी उपस्थित होते.
चौकट
आरोग्य केंद्रांसाठी ९ कोटी रुपये
जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांच्या सुधारणांसाठी ९ कोटी रुपये खर्च करणार असल्याचे जितेंद्र डुडी म्हणाले. यामध्ये इमारतींची दुरुस्ती, केंद्रात आरोग्यविषयक सुविधा आदी कामे केली जाणार आहेत.