सांगलीवर धुक्याची चादर, सलग दोन दिवस अनुभव : हवामानातील लहरीपणा सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:50 PM2018-09-12T12:50:05+5:302018-09-12T12:53:32+5:30
सांगली शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानातील लहरीपणाचा अनुभव नागरिकांना येत आहे. सांगली शहर व परिसरात गेली दोन दिवस पहाटे ते सकाळी ८ वाजेपर्यंत धुक्यांची चादर पसरली जात आहे. निसर्गाची वेगवेगळी रुपे एकाच दिवसात दिसू लागली आहेत.
सांगली : शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानातील लहरीपणाचा अनुभव नागरिकांना येत आहे. सांगली शहर व परिसरात गेली दोन दिवस पहाटे ते सकाळी ८ वाजेपर्यंत धुक्यांची चादर पसरली जात आहे. निसर्गाची वेगवेगळी रुपे एकाच दिवसात दिसू लागली आहेत.
सांगली शहरात मंगळवारप्रमाणे बुधवारीही पहाटे सहा वाजल्यापासून आठवाजेपर्यंत धुक्यांची चादर पसरली होती. दाट धुक्यांमुळे फिरायला जाणाऱ्या नागरिकांसह, शाळकरी मुले, व्यावसायिक यांना धुक्यांमधून वाट शोधत जावे लागले.
दाट धुके असल्यामुळे पहाटे तुरळक वाहतूक असूनही वाहनांना सावकाश जावे लागत होते. आठ वाजल्यानंतर सूर्यदर्शन झाले. मंगळवारीही अशीच परिस्थिती होती. सकाळ दाट धुके आणि दुपारी कडक ऊन असा अनुभव नागरिकांनी घेतला.
मंगळवारी दुपारी शहरासह जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान ३२ अंशापर्यंत गेले होते. गेल्या आठवड्यात उकाडा आणि थंडी असे दोन्ही अनुभव एकाच दिवसात येत होते. आता धुके आणि कडक उन्हाचा खेळ सुरू झाला आहे.
भारतीय हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार आगामी चार दिवस तापमानात मोठे चढ-उतार अनुभवास येतील. १६ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसवर तर किमान तापमान २१ अंशापर्यंत जाणार आहे.
१७ व १८ सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या काही भागात पावसाची चिन्हे आहेत. हवामानाचा हा लहरीपणा आता आणखी काही दिवस नागरिकांना सोसावा लागणार आहे.