भाजपपाठोपाठ दोन्ही काँग्रेसचे नगरसेवकही सहलीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:50 AM2021-02-21T04:50:28+5:302021-02-21T04:50:28+5:30

सांगली : महापौरपदाच्या निवडीत दगाफटका होऊ नये, यासाठी भाजपपाठोपाठ राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नगरसेवकही शनिवारी गोवा व कोकणच्या सहलीवर रवाना ...

Following BJP, both Congress corporators are also on tour | भाजपपाठोपाठ दोन्ही काँग्रेसचे नगरसेवकही सहलीवर

भाजपपाठोपाठ दोन्ही काँग्रेसचे नगरसेवकही सहलीवर

googlenewsNext

सांगली : महापौरपदाच्या निवडीत दगाफटका होऊ नये, यासाठी भाजपपाठोपाठ राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नगरसेवकही शनिवारी गोवा व कोकणच्या सहलीवर रवाना झाले. आघाडीत महापौरपदासाठी प्रत्येकी सव्वा वर्षाचा पर्याय पुढे आला आहे. दरम्यान, गोव्यात आपले २७ नगरसेवक एकत्र असल्याचा दावा भाजपने केला आहे.

महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक येत्या मंगळवारी (दि. २३) होत आहे. सत्ताधारी भाजपचे ४३ सदस्य असले, तरी यातील नऊ नगरसेवक नाराज असून, त्यांच्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीने गळ टाकला आहे. आघाडीचे संख्याबळ ३५ असून, बहुमतासाठी आणखी पाच सदस्यांची गरज आहे. आघाडीच्या हालचालींमुळे भाजपची चिंता वाढली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीत महापौरपदावरून घोळ सुरू असला तरी, सव्वा वर्षाची समान संधी दोन्ही पक्षांना मिळावी, सुरुवातीला राष्ट्रवादीला व नंतर काँग्रेसला महापौरपद मिळावे, असा पर्याय शनिवारी पुढे आला. त्यावर रविवारी शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत.

काँग्रेसचे नेते सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी शनिवारी राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांशीही चर्चा केली. एकसंधपणे लढण्याची सूचना दिली. हालचालींबाबत दोन्ही पक्षाच्या स्तरावर कमालीची गोपनीयता बाळगली आहे. राष्ट्रवादीचे बहुतांश सदस्य शनिवारपासून ‘नॉट रिचेबल’ झाले. राष्ट्रवादीचे नगरसेवक गोवा व कोकणात वेगवेगळ्या ठिकाणी सहलीवर रवाना झाले. काँग्रेसचे काही नगरसेवक अद्याप सांगलीत असून, ते रविवारी सहलीवर जाणार आहेत. सर्वजण थेट मंगळवारीच परततील.

चौकट

राज्यपातळीवरील नेते सक्रिय

भाजपकडून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, राष्ट्रवादीकडून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी, तर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी महापौरपदाच्या निवडणुकीत लक्ष घातले आहे.

चौकट

भाजपचे दोन नाराज परतले

भाजपमधील नाराज नऊपैकी दोन नगरसेवकांना समजावण्यात भाजपला यश आले आहे. अन्य सात सदस्य अद्याप ‘नॉटरिचेबल’ आहेत. त्यातील दोघांना गृहीत न धरण्याची मानसिकता भाजपच्या नेत्यांनी केली आहे. संख्याबळ काठावरच राहत असल्यामुळे दगाफटका होण्याची चिंता त्यांना लागली आहे.

चौकट

भाजपचे २७ सदस्य गोव्यात

शनिवारी भाजपचे आणखी आठ-नऊ नगरसेवक गोव्याला रवाना झाले. सध्या गोव्यात २७ नगरसेवक एकत्र असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. उर्वरित नगरसेवकांनाही एकत्रित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: Following BJP, both Congress corporators are also on tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.