मंदिर परिसरातील तीनशे एकर क्षेत्रात सामाजिक वनीकरण विभागाने विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली आहे. वृक्षसंगोपनासाठी विविध सामाजिक संस्था व शाळा नेहमीच पुढाकार घेतात. वनीकरण विभागाने लाखो रुपये खर्च करून वनीकरणासभोवती तारेचे संरक्षक कुंपण उभारले आहे. याशिवाय देखभालीसाठी वनरक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. परंतु अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वनीकरणाभोवती घालण्यात आलेले तारेचे कुंपण काहींनी तोडले आहे.
संरक्षक कुंपण नसल्यामुळे वनीकरणात राजरोसपणे जनावरे फिरतात. गेल्या काही दिवसात हा परिसर तळीराम व प्रेमीयुगुलांचा अड्डा बनत आहे. मौजमजा करण्यासाठी या परिसराचा वापर होऊ लागला आहे. वन विभागाला याची माहिती असतानाही जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे. वरील गैरप्रकार थांबविण्यासाठी वनीकरण विभागाने येथे कायमस्वरूपी वनरक्षक व अन्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी जत शहरातील विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमधून होत आहे.
फाेटाे : ०३ जत १