माजी आमदार संभाजी पवार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:26 AM2021-03-16T04:26:54+5:302021-03-16T04:26:54+5:30

सांगली : कुस्ती व राजकीय क्षेत्रात इतिहास घडवत संपूर्ण महाराष्ट्रात वेगळी छाप पाडणारे बिजली मल्ल माजी आमदार संभाजी पवार ...

Former MLA Sambhaji Pawar passes away | माजी आमदार संभाजी पवार यांचे निधन

माजी आमदार संभाजी पवार यांचे निधन

Next

सांगली : कुस्ती व राजकीय क्षेत्रात इतिहास घडवत संपूर्ण महाराष्ट्रात वेगळी छाप पाडणारे बिजली मल्ल माजी आमदार संभाजी पवार (वय ८०) यांचे रविवारी मध्यरात्री निधन झाले. सोमवारी दुपारी सांगलीतील अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संभाजी पवार गेल्या काही वर्षांपासून पार्किन्सनच्या आजाराने ग्रस्त होते. मुंबईत गतवर्षी त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्याचवेळी त्यांना कोरोना झाला होता. त्यावरही त्यांनी मात केली होती. रविवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, पृथ्वीराज आणि गौतम ही मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

कुस्तीमध्ये देशभरात नावलौकिक मिळविलेले वज्रदेही हरिनाना पवार यांचे ते पुत्र होत. चटकदार व जलदगतीने प्रतिस्पर्धी मल्लाला चितपट करण्यात संभाजी पवार यांची हातोटी होती. बिजलीच्या म्हणजेच विजेच्या चपळतेने त्यांच्या कुस्त्या व्हायच्या म्हणून त्यांना ‘बिजली मल्ल’ म्हटले जात असे. महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, कर्नाटक या राज्यांमध्ये त्यांच्या कुस्तीचे चाहते आहेत.

राजकीय क्षेत्रातही दबदबा निर्माण केला. सुरुवातीला ते नागरिक संघटनेकडून नगरसेवक झाले. १९८६ मधील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सांगलीतून काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे पुतणे विष्णुअण्णा पाटील यांचा पराभव करून ते पहिल्यांदा आमदार बनले. १९८६, १९९० आणि १९९५ अशा सलग तीन निवडणुका त्यांनी जनता दलाकडून जिंकल्या. २००९ मध्ये त्यांनी भाजपकडून ही जागा जिंकली. जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष, भाजपचे प्रदेश उपाध्यक्षपदही त्यांनी सांभाळले. कारंदवाडी (ता. वाळवा) येथील सर्वोदय सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक होत. हातगाडीवाले छोटे विक्रेते, हमाल, रिक्षा चालक, झोपडपट्टीधारक यांच्यासाठी त्यांनी लढे दिले.

भाजपमध्ये २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीवेळी त्यांचे नेत्यांशी मतभेद झाले. तेव्हापासून ते राजकारणापासून दूर होते, मात्र विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडत राहिले.

सोमवारी सकाळी निधनाचे वृत्त आल्यानंतर कुस्तीसह राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली. क्रीडा, राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, सहकार अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली. निवासस्थानापासून वखारभाग, पटेल चौक, राजवाडा चौक, हरभट रस्ता, मारुती रस्त्यामार्गे त्यांची अंत्ययात्रा मारुती चौकात आली. येथील त्यांच्या कार्यालयाबाहेर पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी आमदार प्रा. शरद पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते.

चौकट

शहरातील व्यवहार बंद

संभाजी पवार यांच्या निधनानंतर सांगलीतील व्यापाऱ्यांनी व्यवसाय बंद ठेवून त्यांना आदरांजली वाहिली. वखारभार, गणपती पेठ, हरभट रोड, मारुती रोड, गावभाग परिसरातील व्यवहार सायंकाळपर्यंत बंद होते. अंत्ययात्रेवेळी व्यापारी, विविध मंडळे, संस्थांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.

Web Title: Former MLA Sambhaji Pawar passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.