चाळीस महिला शिक्षिकांनी सर केले कळसुबाई शिखर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:29 AM2021-03-09T04:29:06+5:302021-03-09T04:29:06+5:30
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यातील महिला शिक्षकांनी अहमदनगरमधील सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच असलेले कळसुबाई शिखर सर केले. वय वर्षे ३० ...
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यातील महिला शिक्षकांनी अहमदनगरमधील सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच असलेले कळसुबाई शिखर सर केले. वय वर्षे ३० पासून अगदी निवृत्तीच्या टप्प्यावर पोहोचलेल्या या धाडसी ४० महिलांनी हे शिखर सर करीत ‘हम भी कुछ कम नही’ हेच जणू सिद्ध केले आहे.
तासगाव येथील एका ट्रेकर्स ग्रुपच्या मदतीने हे धाडसी कार्य केले आहे. १६४६ मी. उंच असणारे शिखर काहींनी अडीच तासात, तर काहींनी चार तासात सर केले. व्हाॅट्स ॲपच्या सोशल ग्रुपवरून या मोहिमेची आखणी व नियोजन झाले होते. केवळ मौज व पर्यटनाऐवजी भोगोलिक व ऐतिहासिक माहितीसाठी या महिलांनी कळसुबाईचे आव्हानात्मक ठिकाण निवडले.
ट्रेकिंगसाठी आवश्यक काठी व स्पोर्ट्स शूजसह भल्या पहाटे साडेतीन वाजता शिखर सर करण्याच्या मोहिमेस प्रारंभ केला. दहा-दहा महिलांचा गट व वॉकिटॉकीच्या मदतीने सुरक्षित पण आव्हानात्मक प्रवास सुरू झाला आणि तीन तासांनी शिखर सर झाले. निवृत्तीजवळ आलेल्या चार महिलांनीही शिखर सर करण्याचा पराक्रम केला. जिथे पुरुषही अडखळतात, पडतात, अशा डोंगरवाटा, कडा तुडवीत या महिला शिक्षिका कळसुबाई मंदिराजवळ पोहोचल्या.
या मार्गात दरी दिसेल अशा खड्या पायऱ्या होत्या. पायावर ताण आल्याने अनेकांचे पाय लटपटत होते. पण मोहीम फत्ते झाली.
शिखर उतरल्यानंतर सर्व महिलांचा ट्रेकर्स ग्रुपच्यावतीने सत्कार करण्यात आला. कवठेमहांकाळ तालुक्यातील या सावित्रीच्या लेकींनी, आपण हिरकणीच्याही वारसा आहोत, हेच यातून सिद्ध केले. त्यांच्या या धाडसी कार्याबद्दल शिक्षक संघटनांनी त्यांचे अभिनंदन केले.