निवृत्त कामगारांच्या देण्यांसाठी चार पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 01:01 AM2017-12-05T01:01:04+5:302017-12-05T01:01:04+5:30
सांगली : वसंतदादा कारखान्याच्या निवृत्त कामगारांची ३६ कोटी रुपयांची देणी देण्यास कारखाना व दत्त इंडिया कंपनीने तयारी दर्शविली असून, त्यासाठी चार पर्याय कामगारांसमोर ठेवण्यात येणार आहेत. मंगळवारी दुसºया संघटनेशी चर्चा केल्यानंतर हे पर्याय खुले करण्यात येणार आहेत.
सोमवारी शेतकरी संघटनेचे संजय कोले, सुनील फराटे यांच्याशी वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील व दत्त इंडियाचे संचालक जितेंद्र धारू यांनी चर्चा केली. तासभर चाललेल्या या बैठकीत निवृत्त कामगारांची सुमारे ३६ कोटी रुपयांची थकीत देणी देण्याबाबत कंपनी व कारखाना प्रशासनाने तयारी दर्शविली. ही देणी देण्यासाठी वेगवेगळे चार पर्याय त्यांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांसमोर मांडले. यातील एका पर्यायाबाबत संघटनेने सकारात्मकता दर्शविली आहे. मात्र त्याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय कळविण्यात येईल, असे कोले यांनी सांगितले. या पर्यायानुसार वसंतदादा कारखान्याची काही मालमत्ता तारण ठेवून कामगारांच्या नावे जिल्हा बँकेतून कर्ज काढण्याचा आणि थकीत रकमेला दत्त इंडिया कंपनीची हमी घेण्याचा हा पर्याय आहे.
हा पर्याय निवडला गेला, तर कामगारांना एकरकमी सर्व रक्कम दिली जाणार आहे. अन्यथा अन्य तीन पर्यायांबाबत कारखाना त्यांच्याशी चर्चा करेल. अन्य तीन पर्याय काय आहेत, याबाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे. अॅड. के. डी. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कृती समितीशी मंगळवारी चर्चा झाल्यानंतर सर्व पर्याय खुले करण्यात येतील, असे कारखाना अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. जिल्हा बँकेच्या कर्जाबाबतचा पर्याय कायदेशीरदृष्ट्या अडचणीचा आहे की चांगला, याबाबतचा सल्ला कायदेतज्ज्ञांकडून घेण्यात येईल, असे शेतकरी संघटनेच्या लोकांनी सांगितले.
त्यामुळे येत्या चार दिवसात कामगारांच्या देण्यांबाबतचा निर्णय होण्याची चिन्हे आहेत. या बैठकीस शेतकरी संघटनेचे वसंतराव सुतार, रावसाहेब दळवी, बाळासाहेब पाटील, मोहन परमणे, वसंत लिमये, संपत सूर्यवंशी, मोहन पाटील आदी उपस्थित होते.
देण्यांची यादी : खातरजमा करा!
निवृत्त कामगारांच्या थकीत देण्यांबाबतची यादी कारखाना कार्यस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतील कामगारांचे नाव व त्याची थकीत रक्कम याबाबत खातरजमा करून, त्याबाबत काही शंका असल्यास त्यांनी कारखाना प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी बैठकीत करण्यात आले. शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनीही त्याबाबतची कल्पना निवृत्त कामगारांना दिली.
कामगारांना कल्पना
बैठकीनंतर संजय कोले यांनी निवृत्त कामगारांशी चर्चा केली. त्यांना याबाबतची सर्व कल्पना दिली. येत्या चार दिवसात कारखाना सर्व पर्याय खुले करणार आहे. त्यानंतर शेतकरी संघटना कामगारांसोबत चर्चा करून योग्य पर्याय निवडेल. काही निवृत्त कामगारांनी पुन्हा शंका उपस्थित केल्या. त्यावर कोले म्हणाले की, चार दिवसात काय होते ते पाहून निर्णय घेण्यात येईल.