सांगली : ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना घर बांधून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या रमाई घरकुल योजनेतील एक हजार ६३० लाभार्थ्यांच्या घरकुलासाठीच्या दुसऱ्या हप्त्यापोटीचे सुमारे चार कोटी रूपये शासनाकडून मिळाले आहेत. संबधित लाभार्थींच्या खात्यावर तत्काळ हे पैसे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांनी शुक्रवारी दिली.
प्राजक्ता कोरे म्हणाल्या, शासनाच्यावतीने २०१६-१७पासून रमाई घरकुल योजना राबविण्यात येत आहे. २०१६-१७ यावर्षी एक हजार ६८३, २०१७-१८मध्ये दोन हजार १०१, २०१८-१९मध्ये एक हजार ५१०, २०१९-२०मध्ये एक हजार ६९० तर २०२०-२१मध्ये एक हजार ६३० घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. प्रतिलाभार्थी प्रति घरकुल एक लाख २० हजार रूपये अनुदान शासनाकडून दिले जात आहे. आतापर्यंत २०२१साठी ८० टक्केप्रमाणे सुमारे १६ कोटी रूपये दिले आहेत.
चालू २०२०-२१ या वर्षासाठी एक हजार ६३० घरकुलांचे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टाप्रमाणे एक हजार ६३० घरकुलांकरिता यापूर्वी पहिला हप्ता ६० टक्केप्रमाणे म्हणजे प्रति घरकुल ७२ हजार रूपये मिळाला आहे. आता नव्याने २० टक्केप्रमाणे तीन कोटी ९१ लाख रूपये मिळाले आहेत. हा निधी राज्य व्यवस्थापन कक्ष गृहनिर्माण यांच्याकडून बीडीएसद्वारे मिळाला आहे. राज्य पातळीवरून हा निधी थेट संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.