हळद, द्राक्षांसोबत सोयाबीनच्या उत्पादनातही जिल्हा आघाडीवर आहे. सोयाबीन संशोधनासाठी कसबे डिग्रजच्या कृषी संशोधन केंद्राने इंदूरच्या राष्ट्रीय सोयाबीन संशोधन संस्थेशी करार केला असून आजवर चार नव्या वाणांचा शोध लावला आहे. गेल्या पंधरवड्यात तांबेऱ्याला प्रतिकार करणाऱ्या नव्या वाणाच्या संशोधनाने त्यात भर पडली आहे.
नगदी पिकांद्वारे पैसा मिळवून देणाऱ्या सोयाबीनने जिल्ह्यात चांगलाच जम धरला आहे. अनुकूल हवामान, पुरेसे पाणी आणि बाजारपेठ यामुळे सोयाबीन रुजले आहे. गेल्या वीस वर्षांत महाराष्ट्रात सर्वाधिक सोयाबीन पिकविणारा जिल्हा म्हणून सांगलीचा नावलौकिक झाला. यामागे आहे ती शेतकऱ्याची संशोधक वृत्ती. उशिरा पेरणी झालेल्या सोयाबीनला तांबेऱ्यासह पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव सोसावा लागतो, हे लक्षात येताच कसबे डिग्रजच्या कृषी संशोधन केंद्राने पेरणी प्रक्रियेत बदल सुचविले, त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत. फुले अग्रणी, फुले संगम, फुले किमया या काही अधिकाधिक उत्पादन देणाऱ्या वाणांचे संशोधनही कसबे डिग्रजच्या केंद्राने केले. केडीएस ९९२ नावाने सध्या विकसित झालेले नवे वाण तांबेऱ्याला सरस क्षमतेने प्रतिकार करणारे ठरले आहे. त्याला इंदूरच्या संस्थेनेही मान्यता दिली असून लवकरच अधिकृत नावासह उपलब्ध होईल.
उसात आंतरपीक म्हणून सोयाबीनची लागवड हा फंंडादेखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विकसित केला. त्याचे दुहेरी फायदे दिसू लागले आहेत. सोयाबीनच्या पानगळीने उसाला सेंद्रिय खताचा फायदा होऊ लागला आहे. एकरी १५ ते २० क्विंटल उत्पादन मिळत आहे.