काेराेनावरील सर्व औषधे करमुक्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:26 AM2021-04-22T04:26:56+5:302021-04-22T04:26:56+5:30
संख : राज्यात कोरोनाची आपत्ती माेठी आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. उपचारावर लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. अशा ...
संख : राज्यात कोरोनाची आपत्ती माेठी आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. उपचारावर लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. अशा स्थितीत राज्य सरकारने कोरोनावरील सर्व औषधे करमुक्त करावीत. अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष श्रेयश नाईक यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनाची प्रत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना दिली आहे. निवेदनात म्हटले केले आहे की, कोरोनाच्या संकटाने वर्षभरापासून नागरिकांचे जीवन जगणे असह्य झाले आहे. संचारबंदीने जनजीवन विस्कळीत झाले आहेत. शेतमालाचे भाव कमी झाले आहेत. शेतीव्यवसाय धोक्यात आला आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.
शेतीपूरक उद्योगधंदे अडचणीत आहेत. सध्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कुटुंबासह सर्वांना जगण्यासाठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. कर्जाचा बोजा वाढत आहे.
मनोरंजन, करमणुकीची साधने, चित्रपट करमुक्त आहेत. सध्या कोरोनामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. वैद्यकीय उपचारावर लाखो रुपयांचा खर्च करावा लागत आहे. यामुळे कोरोनावरील सर्व औषधे शासनाने करमुक्त करावीत. संकटाच्या काळात लोकांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.