जिल्हा परिषदेत फिजिकल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:25 AM2021-04-13T04:25:31+5:302021-04-13T04:25:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : आरोग्य सेवक, सेविका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची १९५ पदे भरण्यासाठी जिल्हा परिषदेत सोमवारी मुलाखती आयोजित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : आरोग्य सेवक, सेविका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची १९५ पदे भरण्यासाठी जिल्हा परिषदेत सोमवारी मुलाखती आयोजित केल्या होत्या. उमेदवार आणि त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा परिषद परिसर आणि मुख्य इमारतीमध्ये मोठी गर्दी केली होती. फिजिकल डिस्टन्सिंगचा सर्वत्र फज्जा उडाल्याचे दिसत होते.
जिल्हा परिषदेत आरोग्य विभागातर्फे १९५ कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदासाठी सोमवारी मुलाखती आयोजित केल्या होत्या. आयुष वैद्यकीय अधिकारी पदासाठी २५ पदे रिक्त असून, यासाठी ६१ उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविले होते. स्टाफ नर्सच्या १२० जागा असून, १९१ उमेदवारांचे अर्ज आले होते. आरोग्य सेविकांच्या ५० पदांसाठी २७८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांनी दिवसभर गर्दी केली होती. त्यांच्या नातेवाईकांनी गर्दी केल्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कही नव्हते आणि सॅनिटायझरचाही वापर दिसत नव्हता.
चौकट
नियम सर्वांनीच पाळणे गरजेचे
कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन आणि आरोग्य विभाग फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीचा वापर करण्याबाबत आवाहन करीत आहे. मात्र प्रशासनानेच जिल्हा परिषद मुख्यालयात सर्व नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल टीका होत आहे.