पत्नीच्या खुनातील फरार पतीला समडोळीत अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:30 AM2021-09-22T04:30:22+5:302021-09-22T04:30:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पलूस तालुक्यातील बुरूंगवाडी ते धनगाव रस्त्यावर पत्नीचा खून करून तीन दिवसांपासून फरार असलेल्या संशयित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पलूस तालुक्यातील बुरूंगवाडी ते धनगाव रस्त्यावर पत्नीचा खून करून तीन दिवसांपासून फरार असलेल्या संशयित पतीला अटक करण्यात सांगली ग्रामीण पोलिसांना यश आले. गणपत दाजी पवार (वय ५०, मूळ गाव मळवली, ता. मावळ, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. समडोळी (ता. मिरज) येथे त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भिलवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धनगाव रस्त्यावरील कोळसा फॅक्टरीत गणपत पवार व त्याची पत्नी कांताबाई (वय ४५) हे मजुरीचे काम करीत होते. १८ सप्टेंबर रोजी गणपत याने कौटुंबिक वादातून कांताबाई हिला काठीने बेदम मारहाण केली. यात तिचा मृत्यू झाला. खुनानंतर गणपत हा फरार झाला होता.
ग्रामीण पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार कपिल साळुंखे यांना समडोळीच्या बाहेरील बाजूस वस्तीवर एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. उपअधीक्षक अजित टिके, निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर पाटील, संदीप मोरे, कपिल साळुंखे, महेश जाधव, सचिन मोरे यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने भिलवडीत पत्नीचा खून केल्याचे उघडकीस आले. संशयित पवार याला भिलवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.