सांगली : कोरोनाच्या काळात ग्राहक मंचाकडील तक्रारी कमी झाल्या तरी कामकाज मात्र अखंडित राहिले. २०१९ च्या तुलनेत दाव्यांची संख्या तुलनेने कमी राहिली. लॉकडाऊनच्या काळात फक्त एप्रिल महिन्यात कामकाजावर परिणाम झाला.
ग्राहक मंचाच्या अधिकारात वाढ झाल्यापासून ग्राहकांच्या तक्रारींचा ओघ वाढला आहे. विशेषत: पतसंस्था, फायनान्स कंपन्या, विमा, बिल्डर्स, मोबाईल सेवा, वीज कंपनी यांच्यासंदर्भातील तक्रारींमध्ये ग्राहक जागरूक झाल्याचे दिसत आहे. गेल्या काही वर्षांत मंचाकडे तक्रारी दाखल करण्याचे प्रमाण वाढत आहे, हे ग्राहकांतील जागरूकतेचे चिन्ह मानावे लागेल. मंचाचे अधिकार वाढविताना थेट कारागृृहात रवानगी करणे, जबर दंड ठोठावणे, वसुलीसाठी मालमत्तेवर थेट जप्ती आणणे, बोजे चढविणे हे अधिकारदेखील मंचाला मिळाले आहेत. गेल्या जुलै महिन्यात मंचाच्या अधिकारात वाढीचा कायदा करण्यात आला.
ऑनलाईन व्यापारात झपाट्याने वाढ होत असल्याच्या काळात ई-कॉमर्सलादेखील मंचाच्या कार्यकक्षेत आणण्यात आले. त्याचा फायदा ग्राहकांना मिळू लागला आहे. ऑनलाईन मागविलेल्या वस्तूंमध्ये फसवणूक झाल्यास दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न आता राहणार नाही. कोरोना काळात न्यायालये, धर्मादाय कार्यालयांचे काम मंदावले. तक्रारदारांची गर्दी कमी झाली, तरी मंचाचे कामकाज मात्र सुरू राहिले. एप्रिल महिना वगळता प्रत्येक महिन्यात दावे निकाली निघत राहिले. २०१९ च्या तुलनेत तक्रारींचे प्रमाण कमी राहिले, पण कामकाज ठप्प मात्र झाले नाही. यामुळे तक्रारदारांना दिलासा मिळाला. ऑक्टोबर महिन्यात तर विक्रमी ६९ दावे निकाली काढण्यात आले. डिसेंबरमध्ये ४२ दाव्यांची निर्गत झाली.
चौकट
वीज कंपनी, पतसंस्था, बिल्डरविषयी तक्रारी
या काळात अनेकविध प्रकारच्या तक्रारी मंचाकडे दाखल झाल्या. वीज कंपनीच्या सेवेतील त्रुटी, पतसंस्थांकडे अडकलेल्या ठेवी, बिल्डरकडून झालेली फसवणूक, डॉक्टरांचा हलगर्जीपणा, मोबाईल सेवेतील तक्रारी, ऑनलाईन व्यवहारात झालेली फसवणूक अशा अनेक प्रकारच्या तक्रारी मंचाकडे दाखल झाल्या. डॉक्टर व रुग्णालयांसंदर्भातील तक्रारींसाठीही सजग रुग्णांनी मंचाकडे दाद मागितली. अनेक पतसंस्थांच्या संचालकांनाही मंचाने धारेवर धरले आहे.
तक्रारी नेमक्या काय ?
१. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे व उपचारातील दुर्लक्षामुळे आजार बळावला किंवा शारीरिक नुकसान झाल्याबाबत रुग्णांनी मंचाकडे धाव घेतली आहे. एरवी न्यायालयात प्रदीर्घ काळ दावा चालण्याची शक्यता पाहता मंचाकडे येण्याकडेही ग्राहकांचा कल दिसला.
२. बिल्डरने ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे फ्लॅट दिला नाही, विलंबाने दिला. दर्जामध्ये फसवणूक केली, या प्रकारच्या तक्रारीही येत आहेत. पतसंस्थेत ठेव ठेवली; पण आता ती मिळत नसल्याच्या तक्रारींची संख्याही मोठी आहे.
कोट
लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांचे येणे थंडावले तरी मंचाचे कामकाज मात्र सुरूच राहिले. एप्रिल महिना वगळता दावे दाखल होणे व निर्गत करणे हे कामकाज सुरूच राहिले. २० लाखांपर्यंतचे दावे कमी शुल्कात दाखल करता येत असल्याचा फायदा तक्रारदारांना होत आहे. जुलैपासून अधिकार वाढल्याचाही फायदा झाला आहे. लॉकडाऊन असतानाही कामकाजावर विशेष परिणाम झाला नाही.
- नागेश कुणाळे, रजिस्ट्रार, ग्राहक मंच
पॉईंटर्स
२०२० मध्ये दाखल तक्रारी
जानेवारी ३८, फेब्रुवारी ३७, मार्च २४, एप्रिल ०, मे ४, जून २८, जुलै ४३, ऑगस्ट २५, सप्टेंबर १६, ऑक्टोबर २६, नोव्हेंबर २२, डिसेंबर ३०
२०१९ मधील तक्रारी - दाखल ३८५, निर्गती ६४५
२०२० मधील तक्रारी - दाखल २९३, निर्गती २३०