माडगुळेत १७ जानेवारीला ‘गदिमा महाेत्सव’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:23 AM2021-01-04T04:23:15+5:302021-01-04T04:23:15+5:30
आटपाडी : थोर साहित्यिक व आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त २८ वा ...
आटपाडी : थोर साहित्यिक व आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त २८ वा गदिमा काव्य महोत्सव दि. १७ जानेवारीला माडगुुुळे (ता. आटपाडी) येथेे आयोजित करण्यात आला आहे.
नारायण सुर्वे कला अकादमी, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा-आटपाडी, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा-भोसरी व माडगुळे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव होणार आहे. या कार्यक्रमाच्या नियाेजनासाठी रविवारी आटपाडीत बैठक पार पडली. या महोत्सवामध्ये गदिमा वारसदार कवी, महाराष्ट्रातील सहा कवितासंग्रहांना पुरस्कार, गदिमा जीवन गौरव पुरस्कार, शिवाजी सावंत यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मृत्युंजय साहित्य पुरस्कार, गदिमा लोककलावंत पुरस्कार व गदिमा जन्मशताब्दी सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
बैठकीस गदिमा महोत्सवाचे स्वागताध्यक्ष तथा नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा आटपाडीचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा भोसरीचे अध्यक्ष मुरलीधर साठे, कार्यवाह प्रा. दिगंबर ढोकळे, प्रसिद्ध कवी राजेंद्र वाघ, प्रा. विश्वनाथ जाधव, मुक्तेश्वर माडगूळकर, सरपंच संजय विभूते आदी उपस्थित होते. यावेळी सदाफुले म्हणाले, की यंदाचा गदिमा महोत्सव हा माडगूळकरांच्या गावी होत असताना आम्हा सर्व साहित्यिकांना प्रचंड आनंद होत आहे. गेली सत्तावीस वर्षे आम्ही हा महोत्सव आयोजित करीत आहोत. सुदाम भोरे यांनी गदिमा महोत्सवात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा मांडली.
माणदेशातील साहित्य विश्वाचे नेतृत्व माडगूळे केंद्रस्थानी ठेवून माडगूळकर परिवारातर्फे गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी करावे. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे पाच अध्यक्ष देण्याऱ्या आटपाडी तालुक्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावे यासाठी भविष्यात प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा साहित्यप्रेमी सादिक खाटीक यांनी यावेळी व्यक्त केली. दिगंबर ढोकळे यांनी प्रास्ताविक केले, तर प्रा. विजय शिंदे यांनी आभार मानले.
फाेटाे : ०३ आटपाडी १