अशुतोष कस्तुरे ।कुंडल : कुंडल (ता. पलूस) या गावाने गेली १५ वर्षे ‘एक गाव, एक गणपती’ची परंपरा जोपासली आहे. नुकतेच या उपक्रमाची दखल घेत तासगाव येथे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर यांच्याहस्ते सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि यात्रा कमिटीच्या शिष्टमंडळास प्रशंसापत्र देऊन गावाचा गौरव करण्यात आला.गावात फक्त ग्रामपंचायत कार्यालयात सार्वजनिकरित्या गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते.
श्रींच्या सर्व धार्मिक विधीसाठी ग्रामस्थ अनंत चतुर्दशीपर्यंत उपस्थित असतात. यातून गावाची एकी दिसते. एखादा सामाजिक हिताचा निर्णय गावाने घेतला, तर त्यासाठी सर्वच स्तरातून राजकारण बाजूला ठेवून संमती दिली जाते.ग्रामपंचायतीने ‘एक गाव, एक गणपती’चा ठराव करून, त्याची प्रत पोलीस ठाण्यास दिली आहे.
गावात कोणत्याही मंडळ-संघटनेने गणेशोत्सव मंडळाची स्थापना करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र वस्त्यांवर तसेच वैयक्तिक जागेमध्ये मोठ्या स्वरूपात गणेशाची स्थापना करणाºया, तसेच पूर्वपरवानगी न घेता गणेशमूर्ती बसविणाºया छोट्या मंडळांना अटकाव कसा करणार, असा प्रश्न आहे.गावाला पुरोगामी विचाराची परंपरा आहे. या विचारातून गावाने एकदा घेतलेल्या निर्णयाला कोणत्याही मंडळातील कार्यकर्त्यांनी खो घालू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायतीकडून जर परवानगीचे पत्र घेऊन कार्यकर्ते आले, तर आम्हाला परवानगी देणे भाग पडते. ग्रामपंचायत स्तरावरच अशा कार्यकर्त्यांना परवानगी देऊ नये. कोणतीही परवानगी न घेता जर कोणी सार्वजनिक गणेशाची स्थापना केली, तर त्यावर कडक कारवाई केली जाईल. याबाबतची कल्पना गावातील प्रमुख मंडळांना दिलेली आहे.- जयश्री पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, कुंडलगावामध्ये कोणत्याही सार्वजनिक मंडळांनी गणेशाची स्थापना करू नये. सार्वजनिकरित्या ग्रामपंचायतीमधील गणपतीच्या धार्मिक कार्यासाठी सर्व नागरिक आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे आणि गावाने घेतलेल्या निर्णयाला हातभार लावावा.- प्रमिलाताई पुजारी, सरपंच