सांगली : येथील गुंड बंड्या ऊर्फ बंडोपंत दडगे व त्याच्या साथीदारांनी गावभागातील सुरेखा सुधाकर पाटील (वय ५२) यांच्या घरात घुसून हल्ला केला. कुटुंबातील सर्वांना बेदम मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. याप्रकरणी बंड्या दडगे, बाळू व्हनगुत्ते व तीन अनोळखींविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.सुरेखा पाटील गावभागातील पाटील गल्लीत नरसोबा बोळात राहतात. शनिवारी रात्री त्यांचे कुटुंब जेवण करुन झोपले होते. मध्यरात्री बंड्या दडगे व त्याच्या साथीदारांनी त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. त्यामुळे या कुटुंबाने दरवाजा उघडला. त्यावेळी बंड्यासह साथीदार घरात घुसले.त्यांनी सुरेखा पाटील, त्यांचा मुलगा व कुटुंबातील अन्य सदस्यांना शिवीगाळ करुन लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यांना जिवे मारण्याची धमकीही दिली. पाटील कुटुंबाने आरडाओरड केल्यानंतर शेजारचे लोक जागे झाले. त्यांनी पाटील यांच्या घराकडे धाव घेतल्यानंतर बंड्या व त्याच्या साथीदारांनी पलायन केले.त्यानंतर पाटील कुटुंबाने शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. सुरेखा पाटील यांची फिर्याद घेऊन पोलिसांनी बंड्या दडगेसह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. अजून कोणाला अटक केलेली नाही.
बंड्या दडगे पुन्हा चर्चेतपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंड्या दगडे हा सुरेखा पाटील यांचा नातेवाईक आहे. किरकोळ कारणावरुन त्यांच्यात काही दिवसापूर्वी वादावादी झाली होता. या वादातून बंड्याने त्यांच्यावर घरात घुसून हल्ला केला. याप्रकरणी सध्या गुन्हा दाखल केला असला, तरी त्यांच्यात समेट घडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.