कुकटोळी दरोड्यातील दोन वर्षानंतर टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:21 AM2021-05-29T04:21:21+5:302021-05-29T04:21:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : दोन वर्षांपूर्वी कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथे दरोडा टाकणाऱ्या सात जणांच्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : दोन वर्षांपूर्वी कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथे दरोडा टाकणाऱ्या सात जणांच्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. चोरलेल्या पैसे व दागिन्यांची वाटणी करण्यासाठी सर्वजण तुरचीफाटा येथे एकत्र जमले असताना सर्वांना अटक करण्यात आले. त्यांच्याकडून एक लाख ७७ हजार १०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अन्यही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली.
किरण उमाजी मलमे (वय २८ रा. एरंडोली), अमोल रमेश नाटेकर (२२), अक्षय रामचंद्र चव्हाण (२४, दोघेही तुपारी), सुनील सिताराम वडर (२३), विजय संभाजी जाधव (२४, दोघेही रा. कुंडल), सुरज गणेश कोरडे (२२ रा. ताकारी) यांना अटक करण्यात आली आहे तर मिलिंद मुकुंद धेंडे (रा. एरंडोली) व विशाल कदम (पलूस) यांचाही सहभाग स्पष्ट झाला आहे.
गेडाम यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी कुकटोळी येथील कुंडलिक वासुदकर यांच्या घरावर दरोडा टाकून रोख रकमेसह ऐवज लुटण्यात आला होता. कवठेमहांकाळ पोलिसात हा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील पाच आरोपी हे तुरची फाटा येथे चारीच्या दागिने व पैशांच्या वाटणीसाठी एकत्र जमले होते. पोलिसांनी याची माहिती मिळताच त्यांनी तेथे जात सर्वांना शिताफीने पकडले.
संशयितांनी पोलिसांना सांगितले की, दोन वर्षांपूर्वी एरंडोली येथे मिलिंद धेंडे याच्या घरी जमलो असताना कुकटोळी येथील कुंडलिक वासुदकर यांनी त्यांची जमीन विकून पैसे घरातच ठेवले आहेत. त्यांचे घर गावाबाहेर असल्याने लुटण्याचा प्लॅन करण्यात आला होता. त्यानुसार संशयितांनी तिथे जात दरवाजा ताेडून घरातील लोकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून पैसे व सोन्याचे मणी मंगळसूत्र चोरले होते.
यातील धेंडे व कदम यांनी सात महिन्यांपूर्वी सावळी येथे घर फोडून सोन्याचे दागिने व पैसे लुटल्याचीही माहिती पथकाला मिळाली. एलसीबीचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप ढेरे, अभिजित सावंत, मारुती साळुंखे, सुनील चौधरी, जितेंद्र जाधव, राहुल जाधव, महादेव नागणे, शशिकांत जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.