सांगली : कचरा उठाव, ड्रेनेजवरून शुक्रवारी महापालिकेच्या महासभेत सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनावर हल्लाबोल केला. पालिकेचे स्वच्छता निरीक्षक आॅनड्युटी बारमध्ये असतात, असा खळबळजनक आरोप सत्ताधारी नगरसेवक विजय घाडगे यांनी केला, तर इतर सदस्यांनी, कागदोपत्री कचरा उठाव होत असून, घर ते कार्यालय असाच आयुक्तांचा प्रवास होतो, ते कधीही प्रभागात फिरत नाहीत, अशी खरमरीत टीकाही केली. महापौर विवेक कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी महापालिकेची तहकूब सभा झाली. सभेच्या सुरूवातीलाच नगरसेविका संगीता हारगे यांनी त्यांच्या प्रभागातील ड्रेनेजचा प्रश्न उपस्थित करीत, या विषयाला वाचा फोडली. वर्षभर तक्रारी करूनही ड्रेनेजची समस्या ‘जैसे थे’च असल्याचा आरोप केला. त्यानंतर मात्र सभागृहात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपच्या सदस्यांनी प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले. गटनेते किशोर जामदार यांनी, ड्रेनेजची अवस्था नाथ असूनही अनाथ अशी झाल्याचे सांगत, दुरुस्तीच्या ठेकेदाराचे बिलच काढले नसल्याचे निदर्शनास आणून दिले. शुभांगी देवमाने यांनी, कचरा उठाव, औषध फवारणी होत नसल्याची तक्रार करीत, आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे कामच करीत नसल्याची टीका केली. सुरेश आवटी यांनी थेट आयुक्तांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, मिरजेत रस्त्यावर कचरा पडला आहे. जनतेच्या रोषाला नगरसेवकांना तोंड द्यावे लागत आहे. आयुक्त कधीही गल्लीबोळात फिरत नाहीत. त्यांना जनतेच्या सुख-दु:खाशी काहीही देणे-घेणे नाही. नागरिकांच्या कराच्या पैशावर त्यांचे पगार होतात. या पगाराच्या २५ टक्के तरी काम अधिकाऱ्यांनी करावे, अशी टीका सुरेश आवटी यांनी सभागृहात केली. राजेश नाईक यांनी स्वच्छता निरीक्षकांकडील विविध परवाने देण्याचे काम काढून घेण्याची, तर हारूण शिकलगार यांनी, कचरा उठावचा ठेका देण्याची मागणी केली. विजय घाडगे यांनी, स्वच्छता निरीक्षक कामाच्या वेळेत बारमध्ये असतात. हा प्रकार अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. वेळेपूर्वीच हजेरी मांडून कर्मचारी निघून जातात, असा खळबळजनक आरोप केला. विष्णू माने म्हणाले की, कचऱ्याचे कंटेनर दुरुस्तीच्या नावाखाली गायब झाले आहेत. नव्याने खरेदी केलेल्या कंटेनरचेही वाटप केलेले नाही. वाहनांवर कागदोपत्री डिझेल खर्ची होत आहे. बोटचेप्या धोरणामुळे शहर बदनाम झाल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, प्रशांत पाटील मजलेकर, युवराज बावडेकर, युवराज गायकवाड, जगन्नाथ ठोकळे, संगीता खोत, संजय मेंढे, मृणाल पाटील, शेवंता वाघमारे, प्रियंका बंडगर, शेखर माने यांच्यासह सर्वच सदस्यांनी प्रशासनावर हल्लाबोल केला. (प्रतिनिधी) वचकच नाही : अभ्यासपूर्ण सूचना करा कचरा उठाव व ड्रेनेजवरून आयुक्त निशाण्यावर होते. अनिल कुलकर्णी यांनी तर, आम्ही घरचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी आलो नाही. या समस्या जनतेच्या आहेत. आयुक्तांचा प्रशासनावर वचकच राहिलेला नाही, असे खेदाने म्हणावे लागेल. तुम्ही कधी प्रभागात फिरल्याचे दिसत नाही, असे सांगून, खालच्या अधिकाऱ्यांना अभ्यासपूर्ण सूचना दिल्या पाहिजेत, असा टोलाही लगाविला. आयुक्तांनी आरोप फेटाळले सर्वपक्षीय सदस्यांनी कचरा उठाव व ड्रेनेज गळतीबाबत आयुक्तांना धारेवर धरले. सभेत आयुक्त अजिज कारचे यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले. घर ते कार्यालय असा प्रकार कधीच घडलेला नाही. प्रत्येक प्रभागात मी गेलो आहे. आजही बारा तास काम करण्याची माझी तयारी आहे. पण यंत्रणाच अपुरी असल्याने, आहे त्या कर्मचाऱ्यांत चांगले काम करण्याचा माझा प्रयत्न आहे. औषध फवारणीसाठी स्वतंत्र युनिट तयार केले आहे. डुकरे पकडण्यासाठी एजन्सी नियुक्त करणार आहोत. मुकादमांना आठवड्यातून दोनदा, तर निरीक्षकांना एकदा नगरसेवकांच्या सहीचे बंधन घातले आहे. त्याशिवाय त्यांचे पगार निघणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. सांडपाणी नदी, नाल्यात टिंबर एरियातील सुलभ शौचालयाचे सांडपाणी नाल्यात सोडल्याचे जगन्नाथ ठोकळे यांनी सांगितले, तर युवराज बावडेकर यांनी, गावभागातील ड्रेनेजचे पाणी थेट नदीपात्रात मिसळत असल्याचे निदर्शनास आणून दिले. प्रशांत मजलेकर यांनी तर, चहा, नाष्टा दिल्याशिवाय ड्रेनेजचे कर्मचारी प्रभागात येत नसल्याचा आरोप केला.
कचरा रस्त्यावर, स्वच्छता निरीक्षक ‘बार’मध्ये
By admin | Published: October 30, 2015 11:43 PM