कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथे तीन दिवस उसाच्या शेतात असणाऱ्या गव्याला वन विभागाने सोमवारी पकडले. गवा अशक्त असल्याचे निदर्शनास आल्यानंतर इस्लामपूर येथील दत्त टेकडी परिसरातील वन कार्यालयाजवळ त्याच्यावर पशुवैद्यकीय अधिकारी उपचार करीत आहेत. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.कामेरी येथील कामेरी-येडेनिपाणी पाणीपुरवठा संस्थेच्या पाचवा टप्पा परिसरात विठ्ठलवाडी-कामेरी दरम्यान मोठ्या प्रमाणात उसाची शेती आहे. येथील एका उसाच्या शेतात शनिवारी (दि. ३ डिसेंबर) शेतकऱ्यांना गवा आढळून आला. यामुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी याबाबत वन विभागाला कल्पना दिली.वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, नागरिकांनी चाहूल लागल्याने गवा दुसऱ्या उसाच्या शेतामध्ये गेला. तेथे ऊस पूर्ण वाढ झाली आहे. शिवाय अनेक ठिकाणी ऊस पडला आहे. यामुळे शनिवारी व रविवारी शोध घेऊनही गव्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर सोमवारी सकाळी ड्रोनच्या साहाय्याने गव्याचा शोध सुरू झाला. यावेळी एका शेतात गवा आढळून आला. तेथून त्याला बाहेर काढत रेस्क्यू व्हॅनमध्ये घालण्यात आले. तो अशक्त असल्याचे लक्षात आले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता गव्याला ताप असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर इस्लामपूर येथील दत्त टेकडी परिसरातील वन विभागाच्या कार्यालयानजीक त्याच्यावर पशुवैद्यकीय अधिकारी उपचार करीत आहेत.त्याला पकडण्यासाठी ग्रामस्थ व राजारामबापू कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले. उपवनसंरक्षक नीता कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे, वनक्षेत्रपाल (शिराळा) सचिन जाधव, मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील, अमोल साठे, प्रकाश पाटील, हनमंत पाटील, शहाजी पाटील, वन्यजीव प्रेमी सुशीलकुमार गायकवाड, अमित कुंभार यांनी गव्याला पकडले. इस्लामपूरचे पशुवैद्यकीय अधिकारी वनरक्षक रायना पाटोळे, डॉ. अंबादास माडकर, डॉ. संतोष वाळवेकर त्याच्यावर उपचार करीत आहेत.
लम्पीची चाचणी होणारकोल्हापुरात नुकतीच एका गव्याला लम्पीची लक्षणे आढळून आली होती. यामुळे कामेरीत सोमवारी पकडलेल्या गव्याच्या नाकातील स्राव लम्पीच्या दृष्टीने चाचणीसाठी घेतल्याचे वनसंरक्षक डॉ. अजित साजणे यांनी सांगितले.