सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जायंट्स ग्रुप ऑफ सांगली सेंट्रलकडून मिरज सिव्हिल रुग्णालयाच्या कोविड सेंटरला मदत करण्यात आली आहे. यामध्ये विविध वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये गेला महिनाभर कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडू लागल्याने मिरज सिव्हिल हॉस्पिटल व मिरज वैद्यकीय महाविद्यालय कोविड सेंटरकडून जायंट्स ग्रुप ऑफ सांगली सेंट्रल या संस्थेकडून मदत मिळावी, यासाठी त्यांनी आवाहन केले होते.
त्या आवाहनास प्रतिसाद देऊन कोविड सेंटरला सेमी फाऊलर बेड, मॅट्रेस, पिलो, आय.व्ही. स्टॅण्ड प्रत्येकी २ सेट, एन ९५ मास्क २०० नग देण्यात आले आहेत. ही देणगी जायंट्स ग्रुप ऑफ सांगली सेंट्रलचे अध्यक्ष हसन समलेवाले यांच्या हस्ते तसेच भालचंद्र लिमये, प्रा. संजीव वालावलकर यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली. यासाठी भालचंद्र लिमये यांनी विशेष प्रयत्न केले.