सांगली जिल्ह्यात २४ तासाला होतेय एका मुलीचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 11:39 PM2019-04-07T23:39:04+5:302019-04-07T23:39:09+5:30
सचिन लाड । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात ३१ अल्पवयीन मुला-मुलींचे अपहरण झाले. यामध्ये मुलींची संख्या ...
सचिन लाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात ३१ अल्पवयीन मुला-मुलींचे अपहरण झाले. यामध्ये मुलींची संख्या अधिक असल्याने चिंतेचा विषय बनला आहे. त्यात २६ मुली व पाच मुलांचा समावेश आहे. आकडेवारी पाहिली तर २४ तासाला एका मुलीचे अपहरण होत असल्याचे दिसून येते. मुलींच्या शोधासाठी पालकांची धावाधाव सुरू आहे. सांगली, मिरजेतील बस व रेल्वे स्थानकावर दररोज मुला-मुलींचा शोध घेतला जात आहे.
अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पोलीस दप्तरी ‘बेपत्ता’ अशीच नोंद होत असे. काही वर्षापूर्वी यामध्ये बदल करण्यात आला. बेपत्ता अल्पवयीन मुला-मुलींचा पोलिसांनी तातडीने शोध घ्यावा, यासाठी गृहविभागाने त्यांची अपहरण झाल्याची नोंद करावी, तसेच २४ तासातील तपासाचा अहवाल द्यावा, असा आदेश काढला. तेव्हापासून बेपत्ता झालेल्या मुला-मुलींचे अपहरण झाल्याची नोंद केली जाते. जिल्ह्यात सातत्याने मुले-मुली गायब होतात. मात्र गेल्या महिन्याभरात तब्बल ३१ मुले-मुली गायब झाली आहेत. यामध्ये २६ मुलींचा समावेश असल्याने पालकांच्यादृष्टीने चिंतेचा विषय बनला आहे. पालकांनी संबंधित पोलीस ठाण्यात फिर्यादी दाखल केल्या आहेत. पोलीस तपास सुरू आहे. परंतु अजून एकाही मुलीचा शोध घेण्यात यश आलेले नाही. जिल्ह्यात २५ पोलीस ठाणी आहेत. या प्रत्येक पोलीस ठाण्यात महिन्याभरात मुलींचे अपहरण झाल्याची नोंद झाली आहे. १२ ते १६ वयोगटातील या मुली आहेत. गेल्या आठवड्यात वडर कॉलनीतील १२ वर्षाची मुलगी घराबाहेर उभी होती. ती अचानक गायब झाली. ही मुलगी मोबाईलही वापरत नाही. त्यामुळे तिचा शोध घेण्याचे आव्हान आहे. अपहृत अन्य मुलींकडे मोबाईल आहेत; पण ते बंद आहेत. तांत्रिक पद्धतीने पोलीस तपास करीत आहेत. पोलीस ठाण्यात दैनंदिन काम खूप असते. सध्या लोकसभा निवडणुकीमुळे पोलिसांना २४ तास कामात अडकून रहावे लागत आहे. यातून या मुला-मुलींचा शोध घेण्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. पालकही शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुली सापडत नसल्याने त्यांची धावाधाव सुरू आहे.
फूस लावून पळविले
अपहृत मुलींच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये, त्यांच्या मुलींना फूस लावून पळविल्याची नोंद आहे. काही प्रकरणात तर लग्नाच्या आमिषाने पळविले, अशी नोंद आहे. बहुतांश प्रकरणात संशयितांची नावे निष्पन्न झालेली नाहीत. काही संशयितांची नावे पुढे आली आहेत, त्यांचा शोध घेतला जात आहे. स्थानिक पोलिसांनी याचा तपास केला नाही, तर ही प्रकरणे अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध विभागाकडे सोपविली जातात.