एकास एक उमेदवार द्या, मगच चर्चेला या; अजितराव घोरपडेंनी संजय राऊतांना स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 05:29 PM2024-04-06T17:29:52+5:302024-04-06T17:30:22+5:30
तुम्हीही फसविणार नाही ना?
सांगली : महायुतीच्या उमेदवाराविरोधात लढण्यासाठी मैदानात उतरताना महाविकास आघाडीतील वाद संपविण्याची गरज आहे. सांगली लोकसभेच्या मैदानात एकास एक उमेदवार द्या, मगच चर्चेला या. त्यावेळी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन प्रचाराचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन माजीमंत्री अजितराव घोरपडे यांनी उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांना दिले.
सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी संजय राऊत शुक्रवारी सांगलीत आले. यावेळी राऊत यांनी कवठेमहांकाळ येथील अजितराव घोरपडे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी राऊत यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यासाठी घोरपडे यांच्याकडे पाठिंबा मागितला. या भेटीविषयी अजितराव घोरपडे ‘लोकमत’शी बोलले.
ते म्हणाले, महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करायचा असेल, तर महाविकास आघाडीकडून एकास एक उमेदवार दिला पाहिजे. दोन उमेदवार उभे करून महाविकास आघाडीचा हेतू सफल होणार आहे का? महायुतीचा उमेदवाराचा पराभव होणार का, असा सवालही राऊत यांना केला आहे. एकास एक उमेदवार निवडणूक मैदानात उतरविल्यास माझे सर्व कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करतील, असे आश्वासनही त्यांना दिले आहे.
तुम्हीही फसविणार नाही ना?
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाचा मान राखून भाजपच्या उमेदवाराला दोन लोकसभा निवडणुकीत मदत केली. पण, त्यानंतर फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला नाही. त्याप्रमाणे संजय राऊत तुम्हीही आम्हाला फसविणार नाही ना, असा सवालही घोरपडे यांनी राऊत भेटीवेळी केला.