पैसा, गाडी, दागिने द्या अन् नवऱ्याला जणू विकतच घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:22 AM2021-07-25T04:22:39+5:302021-07-25T04:22:39+5:30
सांगली : लग्न म्हणजे दोन जीवांचे आणि दोन कुटुंबांचे मिलन... पण हेच लग्न म्हणजे घरातील अपूर्ण वस्तू घेण्याचे हक्काचे ...
सांगली : लग्न म्हणजे दोन जीवांचे आणि दोन कुटुंबांचे मिलन... पण हेच लग्न म्हणजे घरातील अपूर्ण वस्तू घेण्याचे हक्काचे कार्य म्हणूनच अनेकजण बघत आहेत. त्यामुळेच लग्नात मुलीच्या नातेवाईकांकडून पैसे, महागडे संसारीक साहित्य, दागिने मिळावेत, यासाठी हट्ट होत असून, लग्नानंतरही यासाठी विवाहितांना छळाचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.
मुलींच्या, मुलींच्या पालकांच्या अपेक्षा आणि लग्न ठरण्याअगोदर त्या कबूल करणाऱ्या मुलांच्या घरच्यांकडून लग्नानंतर मात्र वस्तू, पैसे आणि इतर कारणासाठी तगादा लावला जात आहे. यात योग्य मानपान मिळाले नाही म्हणूनही अनेक विवाहिता त्रास सहन करत आहेत.
चौकट
अशिक्षितांपासून उच्च शिक्षितांपर्यंत...
* पूर्वी कमी शिक्षण असलेल्या कुटुंबांकडूनच हुंड्यासाठी मुलीचा छळ होत असे. आता आपल्या कुटुंबाच्या आणि घराण्याच्या आत्मसन्मानासाठी परक्याच्या मुलींना त्रास दिला जात आहे.
* लग्नात जेवणातील मेन्यूवरुनही काही विवाहितांना छळ सहन करावा लागल्याची उदाहरणे आहेत.
* सध्याच्या आकडेवारीत तर सुशिक्षित कुटुंबांकडूनच छळाच्या घटना वाढल्याचे स्पष्ट होत आहे.
चौकट
हुंडा म्हणायचा की पोराचा लिलाव?
१) लग्न ठरण्याअगोदर काहीही न बाेलणाऱ्या मुलाच्या घरच्यांना लग्नानंतर मात्र मोह सुटतो.
२) मुलाला जे देणार ते शेवटी तुमच्याच मुलीचे असणार आहे, अशी सारवासारवही केली जाते.
३) घरच्यांच्या दबावामुळे विवाहानंतर मुलाकडूनही विवाहितेचा छळ वाढत आहे.
कोट
मुलीच्या आई-वडिलांची पारख आवश्यक
लग्नाअगोदर चांगल्या वागणाऱ्या मुलांच्या घरच्या व्यक्ती नंतर क्षुल्लक कारणावरुन वाद सुरु करतात. अगदी न्यायालयापर्यंत हे वाद जातात. त्यामुळे मुलीच्या आई-वडिलांनी आपली मुलगी देताना मुलाचे घर नीट पारखूनच दिल्यास पुढील संकट टळणार आहे.
- ज्योती आदाटे, सामाजिक कार्यकर्त्या
चौकट
नवी पिढी बदलतेय...
कोट
सध्या माझ्या लग्नाची तयारी सुरु आहे. मात्र, मी मुलाशी हुंडा आणि इतर अपेक्षांविषयी चर्चा करुनच पुढील निर्णय घेणार आहे. माझ्या आई-वडिलांकडून काही मागण्यापेक्षा स्वहिमतीवर सर्व मिळवणारा तरुणच योग्य वाटतो.
- तनुजा सूर्यवंशी
कोट
लग्नातील मानपान आणि त्यासाठी मुलीचा छळ मनाला पटत नाही. त्यामुळेच मी कुटुंबातील सदस्यांना अगोदरच सांगून ठेवले आहे. आपल्या कुटुंबाला शोभेल अशीच मुलगी बघू पण तिच्याकडून काही अपेक्षा करणार नाही.
- स्वप्नील कोरे
चौकट
हुंड्यासाठी छळाचे गुन्हे
२०२० १०२
जून २०२१पर्यंत ६१